स्टाफ सिलेक्शनची परीक्षा अचानक रद्द; उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण

सामना प्रतिनिधी । पुणे

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिंपरी-चिंचवड येथे स्टाफ सिलेक्सन कमिशनची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने ही परीक्षा अचानक रद्द केल्याने सर्वच विद्यार्थ्यांना तसेच घरी परतावे लागले आहे. परीक्षा केंद्रावर तब्बल २०० ते ३०० विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते.रविवारी सकाळी विविध पदांसाठी एसएससीतर्फे परीक्षा आयोजित करण्यात आली होती. १० ते १२ पर्यंत चालणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आले होते. चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचे दोन टप्पे यापूर्वीच झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा रविवारी घेतली जाणार होती.

पिंपरी-चिंचवड मधील नागनाथ मारुती गडसिंग ज्युनिअर कॉलेजमध्ये ही परीक्षा होती. यासाठी नांदेड परभणी, लातूर, औरंगाबाद, बीड, राहुरी, नगर, श्रीरामपूर, यवतमाळ विविध ठिकाणांहून उमेदवार आले होते. मात्र, विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जमा झाले असताना सकाळी साडे आठच्या सुमारास प्रशासनाने ही परीक्षाच रद्द झाल्याचे कळवले. प्रशासनाकडून केवळ १० टक्के मुलांना मॅसेज आणि ई-मेलद्वलारे परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली होती. उर्वरीत ९० टक्के उमेदवारांना केंद्रावर आल्यानंतर ही माहिती मिळाली. वेबसाइटवर सुद्धा परीक्षा रद्द झाल्याची माहिती २८ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या