विक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा

सामना ऑनलाईन, बिजींग

सेल्स विभागात म्हणजे कंपनीच्या विक्री विभागात काम करणाऱ्यांच्या डोक्यावर सतत टार्गेट पूर्ण करण्याची तलवार असते. अनेकदा हे लक्ष्य पूर्ण झालं नाही तर त्यांची नोकरी जाऊ शकते किंवा बोलणी खावी लागू शकतात. चीनमधल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल या दोन मार्गांचा अवलंब न करता आणखी भयंकर शिक्षा देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना स्वत:चं मूत्र पिण्याची सक्ती करण्यात आली होती. नोकरी वाचवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी ही शिक्षा निमूटपणे पूर्ण केली.

एक व्हिडीओ सध्या चीनमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कंपनीच्या कार्यालयात काही कर्मचारी उभे असल्याचं दिसतंय. दोन जणांना कार्यालयाच्या मध्यभागी उभं करून त्यांना चाबकाचे फटके मारल्याचं सुरूवातीला या व्हिडीयोमध्ये दिसतं. त्यानंतर दोन कर्मचारी पिवळ्या रंगाचं द्रव्य असलेले ग्लास उचलतात आणि नाक दाबून ते निमूटपणे पितात असं व्हिडीओत दिसतंय. हा व्हिडीयो ३० ऑक्टोबरचा असल्याचं कळालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या दोन व्यवस्थापकांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं कळतंय.