चेंगराचेंगरीवर नियंत्रण ठेवणारे तंत्र विकसित ;आयआयटी मद्रासच्या संशोधकांचे यश

21

सामना ऑनलाईन । चेन्नई

कुंभमेळा, हज यात्रा , धार्मिक, सामाजिक मेळाव्यांत अथवा गर्दीच्या ठिकाणी होणाऱया चेंगराचेंगरीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळवता येईल असे तंत्र आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी विकसित केले आहे. या नव्या तंत्राने कमीत कमी मनुष्यबळ वापरून प्रचंड गर्दीचे योग्य नियंत्रण करता येणार असून सार्वजनिक कार्यक्रमांत चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनांतून होणारी जीवित अथवा मनुष्यहानी रोखणे शक्य होईल असा दावा हे तंत्र शोधणाऱया शास्त्रज्ञांनी केला आहे.

आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी गर्दीच्या ठिकाणी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीचा संगणकीय अभ्यास करून अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास केला. गर्दीचे नियंत्रण करण्याचे आधुनिक तंत्र या संशोधकांनी शोधून काढले आहे. या शोधावरील शोधनिबंध ‘जर्नल फिसिकल रिह्यू लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या संशोधकांनी कुंभमेळा, हज यात्रा, मरिना बीचवरील मेळावा आणि मुंबईत घडलेल्या एल्फिन्स्टन रेल्वे पूल दुर्घटनांचा बारकाईने अभ्यास करून चेंगराचेंगरी रोखण्यासाठीचे उपाय सुचवले आहेत.

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनांमागची कारणे आणि त्यावरील उपाययोजना आम्ही सुचवल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि सरकारी यंत्रणांची मदत घेऊन नव्या तंत्राने चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना रोखता येतील असा विश्वास आयआयटी मद्रासचे प्राध्यापक महेश पंचागनूला यांनी व्यक्त केला. एखादा इव्हेंट कधी सुरू होणार आणि त्यात किती लोक जमतील याची माहिती आधी मिळाल्यास गर्दीत होणाऱया दुर्घटना रोखण्याचे उपाय करता येतील, असेही पंचागनूला यांनी स्पष्ट केले. हे तंत्र शोधणाऱया संशोधकांत सुमेश पी. थंपी आणि अजिंक्य कुलकर्णी यांचाही समावेश आहे.

आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी सुचवलेले उपाय

  • धार्मिक यात्रा, मेळावे, खेळाचे इव्हेंटस् आणि सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचा अंदाज घेऊन संभाव्य दुर्घटना टाळता येतील.
  • गर्दीच्या ठिकाणी विशिष्ट जागी बॅरिकेडस्सारखे अडथळे ठेवणे.
  • अफवाखोर अथवा हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या जागी सुरक्षा जवानांची नियुक्ती.
  • गर्दीवर ड्रोनने लक्ष ठेवून तिचे नियंत्रण करण्यासाठीचे उपाय तत्काळ योजता येतील.
आपली प्रतिक्रिया द्या