अंबरनाथच्या शिवमंदिर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरीत 11 जण जखमी

शिवमंदिर फेस्टिव्हलमध्ये नामवंत गायकांच्या गाण्यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. प्रवेशद्वार उघडताच लोंढेच्या लोंढे आत शिरल्याने एकच गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक लहान मुले, वृद्ध, महिला खाली कोसळल्या असून पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने पळापळ झाली. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले असून एका चिमुकल्याचा पाय मोडला आहे. ढिसाळ आयोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसल्याने अंबरनाथमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी अंबरनाथमध्ये शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतो. यंदा 16 मार्चपासून हा फेस्टिव्हल सुरू झाला. रविवारी फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आयोजकांनी चार गेट उभारले. रविवारी संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची संख्या दुप्पट होती. गर्दी असल्याने अर्धा ते पाऊण तास आधीच गेट उघडणे गरजेचे होते. पण आयोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास कार्यक्रमाच्या फक्त 15 मिनिटे आधी मुख्य प्रवेशद्वार उघडताच लोंढेच्या लोंढे आत शिरले आणि तिथेच घात झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने अनेकजण एकमेकांच्या अंगावर आदळले. त्यात अरुण नाचणे, श्वेता खंदारे, अक्षरा खंदारे, मंगला कांबळे, सुरेश गायकवाड, स्वरा खंदारे, सिमरन पिल्ले, शबीन पिल्ले, उषा सिंग हे जखमी झाले. तर यतिन तेवर या 12 वर्षीय मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी चपलांचा खच

या चेंगराचेंगरीमुळे अंबरनाथ फेस्टिव्हलच्या कार्यक्रमस्थळी चपलांचा अक्षरशः खच पडला होता. काहींचे तर मोबाईलही गायब झाले. दरम्यान पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी आज तातडीने अंबरनाथमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. मात्र या प्रकाराची चौकशी करणे अपेक्षित असताना तशा कोणत्याही सूचना आयुक्तांनी दिल्या नसल्याचे समजते.

पासचे कलर झेरॉक्स काढले आणि गर्दी वाढली

आयोजकांनी विविध क्षेत्रांतील लोकांना शिवमंदिर फेस्टिव्हलचे व्हीआयपी पास वाटले होते. त्यातील अनेकांनी या पासच्या कलर झेरॉक्स काढल्या. हे डुप्लिकेट पास घेऊन काही जण कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे येथे गर्दी वाढली. वेळीच गर्दीचे नियोजन केले असते तर ही घटना घडली नसती असे अनेकांचे म्हणणे आहे.