मराठी माणूस पंतप्रधान होण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहा – संजय राऊत

3353

महाराष्ट्र हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. महाविकास आघाडीचा पॅटर्न हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 48 खासदार याच विचाराचे निवडून यायला हवेत. आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 ला हे परिणाम दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना नगरसेवक, नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हे अध्यक्ष असलेल्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवारी, 25 जानेवारी रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात ‘आमने सामने’ ही शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. पत्रकार, प्रसिद्ध मुलाखतकार राजू परुळेकर यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी विविध प्रश्नांना राऊत यांनी बिनधास्त उत्तरे दिली. सुमारे सवा तास चाललेल्या या मुलाखतीसाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याने सभागृह तुडुंब भरले होते. मुलाखतीदरम्यान टाळय़ा, शिट्टय़ा आणि हास्याची कारंजी उसळत होती. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ही मुलाखत अधिकाधिक रंगत गेली.

पवारांना ‘ईडी’ची नोटीस आली आणि…

शरद पवार यांना ‘ईडी’ची नोटीस आली आणि त्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनासाठी महाविकास आघाडीची कल्पना आपल्याला सुचल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. या सत्तेचे शिल्पकार मात्र शरद पवार असून, आपण फक्त एक कार्यकर्ता आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त नाव घेतले जात होते, पडद्यामागे मात्र वेगळेच सुरू होते, सूडाचे राजकारण सुरू होते. सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यागत भाजपचा कारभार सुरू होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की, सत्ता ही चंचल आहे, ती आज आहे, उद्या नाही. सत्ता आली म्हणून मातू नका, गेली म्हणून रडू नका. ती टिकविण्यासाठी वेडेवाकडे उद्योग करू नका. अन् हे वेडेवाकडे उद्योग शरद पवार यांना ‘ईडी’ची नोटीस देण्यापर्यंत गेले आणि तिथेच राज्यातील सत्तापरिवर्तनाची पहिली ठिणगी माझ्या डोक्यात पडली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार हेमंत टकले, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्रालय लोककल्याणकारी कामांसाठी

मंत्रालय हे लोककल्याणकारी कामांसाठी आहे, राज्य घडविण्यासाठी आहे. ते षड्यंत्र, कारस्थान करण्याचं केंद्र होऊ शकत नाही, पक्षातल्या राजकीय विरोधकांना खतम करण्याचा तो अड्डा होऊ नये. असे असले तरी दुर्दैवाने मागील सत्ताकाळात तेच झाले आणि त्याचं फळ म्हणून भाजपला सत्ता गमवावी लागली, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने सूड उगवला, त्यांना विरोधी पक्षनेता व्हावे लागले. महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची आहे, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. यावेळी त्यांनी क्राइम रिपोर्टिंगचे दिवस, सत्तास्थापनेचे नियोजन, भाजपकडून होणारी टीका, फोन टॅपिंग अशा अनेक मुद्दय़ांवर दिलखुलास उत्तरे दिली.

आपली प्रतिक्रिया द्या