संघानेच केली भाजपाची मोठी गोची

39

सामना ऑनलाईन, नागपूर
नागपुरात भाजपामध्ये बंडखोरीला ऊत आलेला आहे. संघनिष्ठ,भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचं तिकीट नाकारण्यात आल्यानं नेत्यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारवाई करणार नाही असं संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी सांगत भाजपाची मोठी अडचण करून टाकली आहे. इतकंच नाही तर वैद्य यांनी सांगितलं की स्वयंसेवकांना मत देण्याचं स्वातंत्र्य आहे, संघ कोणत्याही एका पक्षालाच मत द्या असं सांगत नाही असंही स्पष्ट शब्दात सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक विरुद्ध भाजप असा सामना सुरू झालाय. भाजपनं तिकीट नाकारल्याने संघ स्वयंसेवकांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. या बंडखोरांनी भाजपा विरोधात निवडणूक लढवायचं ठरवलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या महाल भागातील प्रभाग २२ मध्येही भाजपविरोधात संघ स्वयंसेवक उभे ठाकलेय. प्रभाग १९ मध्ये संघात ५५ वर्षे काम केलेले भाजपचे माजी नगरमंत्री श्रीपाद रिसालदार यांनी तर भाजप विरोधात संपूर्ण पॅनलसह निवडणूक लढवायचं ठरवलंय. इतर प्रभागातही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. अतुल सेनाड या स्वयंसेवकानं तर प्रभाग ३१ मधून बसपाची उमेदवारी स्वीकारलीय. तर पश्चिम क्षेत्र प्रचारक रविंद्र जोशी यांची सून विशाखा जोशी शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. शहरातील १० पेक्षा जास्त जागांवर संघ स्वयंसेवक विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची सध्या स्थिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या