विदेशात ‘प्रसिद्ध’ पण देशात ‘भिकारी’

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माणसाकडे एखादी तरी कला असली तर त्या कलेचं कधी ना कधी चीज झाल्याशिवाय राहात नाही. इशामुद्दीन खान नावाच्या एका जादुगाराला मात्र आपली कला सादर केल्यानंतर २२ वर्षांनीही जगण्यासाठी कसरत करावी लागत आहे. इशामुद्दीननं २२ वर्षांपूर्वी एका टोपल्यातून दोरी काढत हवेमध्ये २० फुटांवर तरंगत ठेवत आपल्या जादूचा नमुना सादर केला होता. मात्र २२ वर्षांनंतरही तो आपल्या जादूच्या कलेला ओळख मिळवून देण्यासाठी धडपडत आहे.

इशामुद्दीन यांनी सांगितलं की, या कलेसाठी देशभरात अनेक ठिकाणी दौरे केले, मात्र लोकांकडून रस्त्यावर जादू दाखवणाऱ्यांला चोर किंवा भिकारी म्हणून हिणवलं जाऊ लागल्यानं या कलेला कोणाचं समर्थन मिळू शकलं नाही. मात्र रस्त्यावर सादर केल्या जाणाऱ्या कलांना सरकारनं पाठिंबा द्यावा किंवा त्यांना मदत करावी यासाठी न्यायालयाचा आधार घेणार असल्याचं इशामुद्दीन म्हणतात.

१९९५ ला खान यांनी दोरीला २० फुटांवर तरंगत ठेवून प्रत्येकालाच अचंबित केलं होतं. त्यानंतर त्यांना या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी जगभरातून बोलावण्यात आलं होतं. मात्र हिंदुस्थानात या दुर्मीळ कलेकडे दुर्लक्ष करण्यात आलं. इशामुद्दीन तक्रार करताना सांगतात की, बॉम्बे बेगरी अॅक्ट, १९५९ मुळे रस्त्यावरील कला लोप पावत आहे. या कायद्यामुळेरस्त्यावर परंपरागत कला सादर करता येत नसल्याचं दु:खही इशामुद्दीननं बोलून दाखवलं. सरकारनं रस्त्यावर कला सादर करण्याची परवानगी दयावी अशी मागणी इशामुद्दीन यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या