आयपीएलचे ”स्टार” चमकले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्टार इंडियाने इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल)चे मीडिया हक्क १६,३४७.५० कोटींची सर्वाधिक जास्त बोली लावत खरेदी केले आहेत. याआधी आयपीएलच्या गेल्या काही पर्वांसाठी टेलिव्हिजनचे हक्क हे सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे होते. मात्र आता २०१८ ते २०२२ या पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाकडे असणार आहेत.

आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी सोमवारी स्टार इंडियाने सर्वाधिक जास्त बोली लावून बाजी मारली आहे. या लिलावात जगभरातील नामांकित २४ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र, यापैकी फक्त १४ कंपन्यांनी प्रत्यक्षरित्या आर्थिक बोलीमध्ये भाग घेतला. आयपीएलच्या मीडिया हक्कांची टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन माध्यमांमध्ये विभागणी करण्यात आली होती. यावेळी या लिलावात फेसबुक, अॅमेझॉन, सोनी, रिलायन्स जिओ, स्टार इंडिया, सोनी पिक्चर्स, टाईम्स इंटरनेट, एअरटेल, डिस्कवरी, ब्रिटिश टेलीकॉम अशा अनेक कंपन्यानी सहभाग घेतला होता.

बीसीसीआयला या लिलावातून २० हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. आयपीएलच्या डिजिटल हक्कासाठी टाइम्स इंटरनेट, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि फेसबुक अशा अनेक मोठ्या कंपन्यानी बोली लावली होती. मात्र यामध्ये स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावली. २००८ मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने ८,२०० कोटींची बोली लावत दहा पर्वांसाठी टेलिव्हिजनचे हक्क स्वत:कडे घेतले होते. त्यानंतर २०१५ मध्ये नोवी डिजिटलने ३०२.२ कोटी रुपये मोजून तीन वर्षांसाठी आयपीएलच्या ग्लोबल डिजिटलचे हक्क मिळविले होते.

आपली प्रतिक्रिया द्या