फुलवाचे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन

स्टार प्रवाहवर 18 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. 4 ते 14 वयोगटातील बच्चेकंपनीचे ग्रुप डान्स, सोलो डान्स, डय़ुएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळणार आहेत. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रियालिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत. कार्यक्रमाविषयी सांगताना फुलवा म्हणाली, ‘‘खूप वर्षांनंतर मी पुन्हा एकदा जजची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे उत्सुकता आहे. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे मी हा शो जज करण्यासोबतच बच्चे कंपनीसोबत दर आठवडय़ाला परफॉर्मही करणार आहे. त्यामुळे हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. छोटय़ा दोस्तांचं नृत्यकौशल्य पाहून थक्क व्हायला होतं. त्यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल याची खात्री आहे.’’