महिलेला पाहून डोळा मारणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे, असा निर्णय माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने दिला. 20 वर्षीय तरुणाने महिलेचा हात पकडून डोळा मारला. हे कृत्य स्त्री मनाला लज्जा उत्पन्न करणारे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि तरुणाला विनयभंगाच्या गुह्यासाठी दोषी ठरवले.
भायखळा येथील आरोपी मोहम्मद कैफ मोहम्मद शोहराब फकीर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो डॉकयार्ड रेल्वे स्थानकासमोरील दुकानात कामाला होता. तक्रारदार महिलेने या दुकानातून सामान खरेदी केली होती. त्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी मोहम्मद महिलेच्या घरी गेला होता. महिलेने बाजार खरेदीची पावती मागितली, त्यावेळी त्याने तिचा हात पकडून डोळा मारला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर मोहम्मद पळून गेला. 5 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भायखळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. दोन वर्षे खटला चालल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी मोहम्मदला दोषी ठरवले.
तक्रारदार महिलेला भरपाई देण्याचा आरोपीला आदेश
तरुणाने यापूर्वी कुठला गुन्हा केला नव्हता. तसेच त्याचे वय कमी असल्याचे न्यायालयाने लक्षात घेतले. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने तरुणाला कारावासाची शिक्षा न ठोठावता महिलेला दोन हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तरुणाच्या कृत्यामुळे महिलेला मनस्ताप झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.