प्रत्येक राज्यात ‘टाटा’सारखी दोन रुग्णालये उभारून कॅन्सरचा बीमोड करा! शिवसेनेची राज्यसभेत मागणी

60

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा धोका वाढत चालला आहे. मुंबईच्या टाटा स्मारक रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून कर्करुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे टाटा रुग्णालयावरचा ताण लक्षात घेऊन सरकारने देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये टाटासारखीच किमान दोन रुग्णालये उभारावीत अशी आग्रही मागणी शिवसेनेने आज राज्यसभेत केली. रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांच्या निवासाचीही व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने सांगितले.

कर्करुग्णांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात राज्यसभेत झालेल्या आपत्कालीन चर्चेत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या मुद्दय़ावर प्रकाश टाकला. आपल्याकडे पंधराशे पेशंटमागे एक कर्करोगतज्ञ डॉक्टर असून अमेरिकेत हेच प्रमाण शंभर रुग्णांमागे एक डॉक्टर असे आहे. कर्करोगामुळे मनोहर पर्रीकर, अनंतकुमारांसारखे नेते गमावले. त्यामुळे या आजाराविरोधातील लढाई जिंकण्यासाठी सरकारने अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या पाहिजेत असे राऊत म्हणाले. तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणुशक्ती केंद्र यातून होणाऱ्या रेडिएशनमुळे आसपासच्या परिसरात कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. गोवा, आंध्र आणि आसाममध्ये काही ठिकाणी माशांमुळेही कर्करोग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. टाटा रुग्णालयाचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी तिथे एक भेट द्यावी अशी मागणीही खासदार राऊत यांनी यावेळी केली.

मोटार वाहन विधेयक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल – देसाई
जनताभिमुख तरतुदींमुळे मोटर वाहन विधेयक देशाच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल असा विश्वास यावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला. देशात दरवर्षी तब्बल दीड लाखाच्या आसपास रस्ते अपघात होतात. इच्छा असूनही अनेक लोक पोलिसी खाक्याला घाबरून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे जात नाहीत. या विधेयकात अशा मदत करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे असे देसाई म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या