नाव मोठं लक्षण खोटं, कलाकारांकडे घरकाम करणाऱ्यांची व्यथा

49

सामना ऑनलाईन, मुंबई

मोठ्या किंवा छोट्या पडदे गाजवणारे कलाकार आपल्यापैकी अनेकांना आदर्श व्यक्तिमत्व वाटत असतात. मात्र यातले कलाकार हे अत्यंत भयानक असल्याचं त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्यांनी सांगितलं आहे. घरकाम करणाऱ्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी बुकमायबाई.कॉम हे स्टार्टअप सुरू करण्यात आलं. या स्टार्टअपमधून कलाकारांकडे कामाला गेलेल्यांनी त्यांच्या व्यथा, स्टार्टअप सुरू करणाऱ्या अनुपम सिंहल यांना सांगितल्या. त्याला सिंहल यांनी वाचा फोडली आहे. या व्यथा,अनुभवांनंतर त्यांनी बॉलीवूडमधील कलाकारांना सेवा द्यायचीच नाही असा निर्णय घेतलाय.

सिंहल यांनी यातल्या काही कलाकारांच्या नावाचा खुलासा न करता काही उदाहरण देखील दिली आहेत. सिंहल यांनी सांगितलं की एक महिला कलाकार होती, जिने तिच्या घरी काम करणाऱ्याला त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ दिलं नाही.  त्या घरकाम करणाऱ्याला पर्याय उपलब्ध करून देईपर्यंत तिने त्याला सोडलं नव्हतं. एक कलाकार अशी होती जी घरकाम करणाऱ्या बाईला फक्त चहा आणि पाव द्यायची. ज्यामुळे तिच्याकडे सहा महिन्यात ७ बायकांनी काम सोडून दिलं होतं. घरकाम करणाऱ्यांचा छळ करणाऱ्यांमध्ये सिनेक्षेत्रात राष्ट्रीय पारितोषिकं मिळवणाऱ्या कलाकारांचाही समावेश असल्याचं सिंहल यांनी म्हटलं आहे. एका कलाकाराने तर घरकाम करणाऱ्या महिलेला मारहाण करायला सुरूवात केली होती. तो तिला रोज मारहाण करत होता, ही महिला जेव्हा सिंहल यांच्या कार्यालयात गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. सिंहल यांनी तिला ताबडतोब काम सोडून द्यायला सांगितलं होतं. छळवणुकीच्या प्रकरणांमध्ये सिंहल यांनी पोलिसांत जायची तयारी दाखवली होती, मात्र पोलीस आपलाच छळ करतील असं सांगत या महिलांनी त्यांना रोखलं होतं.

सिंहल यांनी टाईम्स ऑफ इंडीयाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की एका कलाकाराने त्यांना धमकी दिली होती की जर मला घरकामाला बदली बाई दिली नाही तर ते त्यांच्या कंपनीची ट्विटरवर बदनामी करतील. त्यांचे ट्विटरवर ४ लाख फॉलोअर्स आहेत त्यामुळे ही बदमानी टाळायची असेल तर तातडीने बदली घरकाम करणारी द्या अशी धमकीच या कलाकाराने दिली होती.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या