स्टेट बँकेच्या एटीएममधून 18 लाख रुपये लंपास करणाऱ्या सूत्रधाराला साथीदारांसह अटक

39

सामना प्रतिनिधी । नगर

नगर येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून सुमारे 18 लाख रुपये काढून बँकेची फसवणूक करणाऱ्या सूत्रधाराला साथीदारांसह भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे आणखी साथीदार असल्याचे कबूल केले आहे.

आरोपींमध्ये वीरेंद्र अयोध्या, प्रसाद यादव, पवन पुंडलिकराव जीवरक व श्वेता कमलेश सिंग यांचा समावेश आहे. नगर येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून चोरट्यांनी सुमारे 18 लाख 92 हजार पाचशे रुपयांची रोकड लंपास केलेली होती. या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक मेघा शाम इजेवर यांनी 2 जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या माहीतीवरून अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. अन्य काहीजण हे उत्तर प्रदेश येथील त्यांचे साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस कर्मचारी एस के बेंडकोळी, राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब आघाव, अजय नगरे, राजू सुद्रिक, अंबादास पालवे, राजेंद्र द्वारके, सुभाष पाटील, मोहिनी कर्डक, प्रियंका राऊत, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या