
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आज मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
बँकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, सहकारी बँकांना मागील वर्षीच्या निव्वळ नफ्याच्या 1 टक्के निधी सामाजिक कार्यासाठी वापरता येतो. मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ही मर्यादा 2 टक्के इतकी आहे. राज्य बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षात 651 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. त्या अनुषंगाने बँकेने 10 कोटींची मदत दिली आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपल्या नफ्यातील निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत शेतकरी बांधवांना द्यावा, असे आवाहन विद्याधर अनास्कर यांनी केले.
























































