राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर, ‘मग्न तळ्याकाठी’ने बाजी मारली

सामना ऑनलाईन, मुंबई

२९व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल आज सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे जाहीर करण्यात आले. जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई संस्थेच्या ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने साडेसात लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. अनामिका आणि रसिका प्रोडक्शनच्या ‘कोडमंत्र’ या नाटकाने साडेचार लाख रुपयांचे द्वितीय तर सुबक संस्थेच्या ‘अमर फोटो स्टुडियो’ने तीन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळवले आहे.

राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे २ ते ६ मे या कालावधीत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल येथे व्यावसायिक नाटय़ स्पर्धा पार पडली. यामध्ये दहा नाटकांनी भाग घेतला. आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे, अजित सातभाई, सुनील देवळेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दिग्दर्शनाचे दीड लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना मिळाले.

एक लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक ‘कोडमंत्र’ नाटकासाठी दिग्दर्शक राजेश जोशी यांना, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांना ‘अमर फोटो स्टुडियो’साठी दिग्दर्शनाचा तृतीय क्रमांकाचा ५० हजारांचा पुरस्कार मिळाला आहे.

– उत्कृष्ट अभिनय पुरुष कलाकार, प्रत्येकी ५० हजार रुपये – चिन्मय मांडलेकर (नाटक- मग्न तळ्याकाठी), अमेय वाघ (अमर फोटो स्टुडियो), वैभव मांगले (मग्न तळ्याकाठी), सुक्रत जोशी (अमर फोटो स्टुडियो), प्रशांत दामले (साखर खाल्लेला माणूस)
– उत्कृष्ट अभिनय स्त्री कलाकार- मुक्ता बर्वे (नाटक- कोडमंत्र), निवेदिता सराफ (मग्न तळय़ाकाठी), लीना भागवत (के दिल अभी भरा नहीं), हेमांगी कवी (ती फुलराणी), इला भाटे (यू टर्न २)

आपली प्रतिक्रिया द्या