राज्यात 25 लाख नवीन मतदारांच्या नोंदणीचे लक्ष्य, ऑक्टोबरअखेर एकही दुबार मतदार नसेल

  • राजेश चुरी

संपूर्ण राज्यात मतदार नोंदणीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांअंतर्गत 25 लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत चार लाख दुबार मतदार शोधून काढले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार 49 हजार दुबार मतदार शिल्लक आहेत. पण ऑक्टोबरअखेरपर्यंत राज्यात एकही दुबार मतदार नसेल, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

राज्यात सध्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी, कोरोनानंतर स्थलांतरित झालेले मतदार, मतदारांमधील उदासीनता, आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिकांच्या वापराची मागणी, ईव्हीएम मशीनवर घेतलेले आक्षेप अशा विविध विषयांवर प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट मते मांडली.

ईव्हीएमवर राजकीय पक्ष समाधानी

राजकीय पक्षांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही असे म्हणणे योग्य होणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह चर्चेसाठी राजकीय पक्ष व सर्वसामान्यांना आमंत्रित केले होते. ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे आयोगाने आव्हानही दिले होते; परंतु अद्यापपर्यंत कोणीही ईव्हीएम मशीन ‘हॅक’ करू शकलेले नाही 2010 मध्ये सर्व राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच्या बैठकीत ईव्हीएमबाबत समाधानी असल्याचे मान्य केले आहे. तथापि, काही राजकीय पक्षांनी ईव्हीएमसोबतच ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचाही वापर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदाराने दिलेले मत योग्य उमेदवारालाच गेले आहे याची खात्री मतदार करू शकतो.

तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी साक्षरता मंडळे

तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी इयत्ता नववी ते बारावी व कॉलेजमध्ये निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करून त्यांच्या माध्यमातून तरुणांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत जागृती निर्माण केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सर्व कॉलेज व शाळांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या आहेत. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूटय़ूबच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे.

49 हजार दुबार मतदार 

कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची व दुबार मतदारांची नावे वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बरेच दुबार  मतदार एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी स्थलांतरित झाल्यावर पहिल्या ठिकाणचे नाव न वगळता नवीन ठिकाणी नाव नोंदणी करतात. त्यामुळे दुबार नावे नोंदवली जातात. कॉम्प्युटर सिस्टमद्वारे मतदाराचे नाव, वय व छायाचित्राची जुळवणी करून दुबार मतदारांची यादी तयार केली जाते. सध्याच्या कॉम्प्युटर सिस्टमनुसार 49 हजार दुबार मतदार आहेत. त्यांची नावे वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

ईव्हीएम हॅकप्रूफ

ईव्हीएम मशीन हे ‘स्टॅण्ड अलोन मशीन’ आहे. ते कोणत्याही नेटवर्कशी जोडले जात नाही. त्यामुळे ईव्हीएम ‘हॅक’ करता येत नाही.

शहरात प्रमाण कमी

तरुण व उच्चशिक्षित व श्रीमंत वर्गात मतदानाबाबत सरसकट उदासीनता आहे असे ठोसपणे म्हणता येणार नाही. मात्र शहरी भागात मतदारांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘स्विफ्ट’ कार्यक्रमाअंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहे.

स्थलांतरितांची नावे अद्याप कायम

कोरोनानंतर बरेच मतदार तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत. तात्पुरते स्थलांतरित झालेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येत नाहीत आणि त्यांची नावे वगळण्याबाबचे अर्जही मिळालेले नाहीत.

मतदार यादीत घट नाही

कोरोनानंतर अनेकजण मूळ गावी गेले असले तरी मतदार यादीत घट होताना दिसत नाही. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मतदार यादीत सर्वसाधारणपणे 18 वर्षांवरील 70 टक्के लोकसंख्या ही मतदार नोंदणीसाठी पात्र आहे. मतदार यादीत 70 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त मतदारांची नोंदणी झालेली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या