राज्य सरकार शेतकरी विरोधी आहे, दिवसाढवळ्या आयाबहिणीची इज्जत लुटली जाते आहे. त्यांचे खून, अल्पवयीन धनदांडग्यांकडून हिट अँड रन च्या घटना घडत आहेत. राज्याचे गृह खाते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे शेतकरीविरोधी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक करत काँग्रसकडून आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेतेमंडळी मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले की, राजकीय पक्षांची तोडफोड करून बनवलेल्या राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याची पुरती वाट लावली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. शेकतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कांदा दूध दरवाढीचे प्रश्न प्रलंबित आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. विद्यार्थीं, शेतकरी यांचे हाल होत आहेत. रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्र खड्ड्यात आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह हिट अँड रन केसेस मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातील गुन्हेगारांना सोडून देण्याच्या सूचना राज्य सरकार देते आहे. पोलिस भरती चिखलामधे घेतली जाते, नीट चे पेपर फुटतात व त्याचे धागेदोरे गुजराथमधे लागतात अशा अनेक घटनांनी हा देश संकटात सापडलेला आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण हे चिखलफेक आंदोलन केले आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आम्ही सर्वानी सरकारचा निषेध करून सरकारचे प्रतीक असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेवर आम्ही चिखल फासलेला आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे श्रीगोंदा येथील नेते घनश्याम शेलार, पाथर्डी तालुकाध्यक्ष नाजीरभाई शेख, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहकले, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील , शेवगाव तालुकाध्यक्ष समीरभाई काझी, नगर तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संजय आनंदकर सर, उत्तमराव नागवडे, संपतराव म्हस्के, डॉ. अमोल फडके, शरद पवार , कोकाटे सर, अंजुम शेख , किशोर तापकीर, तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.