आप्पापाडय़ातील जळीतग्रस्त कुटुंबीयांना 50 हजारांची मदत, सुनील प्रभू यांचा पाठपुरावा; शिवसेनेच्या मागणीला यश

मालाड पूर्व येथील आप्पापाडा व आनंदनगरमध्ये आग लागून नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासीयांच्या प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांना आज दिले.

या झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एक हजारांहून अधिक झोपडय़ा बेचिराख झाल्या. या झोपडपट्टीवासीयांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी सुनील प्रभू यांनी संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरली होती, पण सरकारने अधिवेशनात मदत जाहीर केली नाही. त्यामुळे सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवून या विषयावर बैठकीची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत राहुल नार्वेकर यांनी आज विधान भवनात ही बैठक आयोजित केली. या आगीत नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासीयांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे आश्वासन सुनील प्रभू यांना दिले. दरम्यान, या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात केली. पण या मदतीसाठी पाठपुरावा करणाऱया शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रेय मिळू नये म्हणून सुनील प्रभू यांच्या नावाचा उल्लेख टाळत फक्त शिंदे गटातील आमदारांची नावे घेतली. पण अध्यक्षांनी सुनील प्रभू यांना त्यांच्या दालनात बैठकीसाठी आमंत्रित करून मदतीची घोषणा केली.