राज्य सरकार व्हेंटिलेटरवर; फेब्रुवारी महिना पाहणार नाही! संजय राऊत यांचे ठाम मत

महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटिलेटरवर असून हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे शनिवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हा देश कायदा आणि संविधानावर चालतो. त्यानुसार हे सोळा आमदार अपात्र ठरतील. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. वेळकाढूपणा चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की व्हेंटिलेटर निघेल आणि त्यामुळे लवकर निकाल लागला तर हे सरकार फेब्रुवारीही पाहणार नाही, असे माझे मत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात सध्या चित्र वेगळे आहे. कधी सरकार उलथेल अन् कधी निवडणुका लागतील, या प्रतीक्षेत जनता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही महावृक्ष आहे. त्याचा कचरा, पालापाचोळा लोक आग लावण्यासाठी नेतात. पण, त्याचा धूर जास्त राहत नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना हाणला. राजकीय विरोधकांना छळण्यासाठी देशभर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. कुणाला तुरुंगात टाकायचं हे केंद्रीय यंत्रणा आणि सत्ताधारी ठरवतात, असेही ते म्हणाले.

नारायण राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार, असे म्हणतात. याबाबत ते म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. यासाठी मी निमित्त ठरलोय. राणे हे उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेत्यांविषयी घाणेरडय़ा शब्दात चिखलफेक करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही कधीकाळी ते ज्ञान देत होते. आता धमक्या देतायेत. राणेंचं किती सहन करायचं, ते कोण आहेत? शेवटी जोडलेले हात सोडावे लागतील. लाचार, दहा पक्ष बदलणाऱया डरपोकांना मी घाबरत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.