राज्य मराठी विकास संस्था

295

 

प्रदीप म्हात्रे

राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना दि. १ मे १९९२ रोजी महाराष्ट्र शासनाने केली. ‘मराठीचा विकास – महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यानुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या सहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते. शासकीय विभाग तसेच शासन पुरस्कृत संस्था यांनी प्रकाशित केलेली दर्जेदार पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचावीत यासाठी संस्था प्रयत्नशील असते. संस्थेने संत साहित्य, चरित्र-आत्मचरित्रे, काव्य, सूची, कोश  प्रकाशित केलेले  आहेत. त्याचबरोबर कृष्णाकाठ, कविता विंदांची, कविता कुसुमाग्रजांची, दासबोध यांसारखी श्राव्य पुस्तके व ‘आकाशदीप’ व ‘पिंपळपान दुर्मिळ’ असलेल्या दृकश्राव्य मालिकाही संस्थेच्या संकेतस्थळावर सहजी उपलब्ध आहेत. लोकवैद्यक प्रकल्पांतर्गत जसकॅप संस्थेच्या सहकार्याने आणि डॉ. सुरेश नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनांतर्गत १८ पुस्तिकांचे अनुवाद तर केलेच, त्याशिवाय त्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध केल्या. इयत्ता ५  वी ते १० वीच्या अभ्याक्रमातील भौतिक, रसायन व जीवशास्त्र्ाातील एकूण तीनशे संकल्पनांचा विज्ञान संकल्पना कोश २००६ साली प्रकाशित झाला. शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने त्या कोशाच्या एक हजार प्रती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वितरित करण्यात आल्या. त्याकरिता स्वतंत्र आवृत्ती काढण्यात आली. अलीकडेच विज्ञान प्रसार (नवी दिल्ली), मराठी विज्ञान परिषद इत्यादी संस्थाच्या सहकार्याने विज्ञानविषयक पुस्तके प्रकाशित करण्यास संस्थेने सुरुवात केली असून त्यापैकी दोन प्रकाशित झाली असून उर्वरित तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटवेर आहेत. संगणकावर मराठीचा वापर वाढावा याकरितासुध्दा संस्था प्रयत्नशील असून मराठी संकेतस्थळांची स्पर्धा संस्थेतर्फे आयोजित करण्यात येते.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या