कर्तव्यदक्षतेला सलाम! शिवशाहीच्या टपावर 9 तास बसून आगार व्यवस्थापकाने सांभाळले तिकीटाचे साडेसात लाख रूपये

अति महाभयंकर अशा पावसाने कोकण किनारपट्टीला अक्षरश: झोडपून काढले. महाड, खेड, चिपळूण या भागांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. हा पाऊस पाहून सगळेजण हादरले होते. अशा परिस्थितीतही आपल्यावर असलेल्या कामाची जबाबदारी न विसरलेल्या धाडसी अधिकाऱ्याची कहाणी जगासमोर आली आहे. या अधिकाऱ्याचे नाव रणजित राजेशिर्के असं आहे. राजेशिर्के हे आगार व्यवस्थापक आहेत.

चिपळूण आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी पावसाला सुरुवात होताच काही तासांमध्ये बस स्थानकात पाणी भरायला सुरुवात झाली. पावसाचा वेग वाढला तसा स्थानकात पाणी वेगाने जमायला लागले. काही तासांत संपूर्ण बस स्थानक हे पाण्याखाली बुडाले होते. या बुडालेल्या बस स्थानकाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. जे पाहिल्यानंतर लोकांना जाणीव झाली की चिपळूणमधली परिस्थिती ही बिकट झाली आहे. बस स्थानकात पाणी भरायला सुरुवात झाल्याचं कळाल्यानंतर राजेशिर्के यांनी प्रवासी तिकीटातून जमा झालेली सर्व रक्कम एकत्र केली. ती व्यवस्थितपणे प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये गुंडाळली आणि नोटा भिजणार नाही याची खबरदारी घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. हे सगळं सुरू असताना राजेशिर्के यांना कळालं की आता बस स्थानकातून बाहेर पडणं मुश्कील आहे, कारण जी परिस्थिती बस स्थानकात होती, तीच परिस्थिती आसपासच्या भागातही होती. पाणी पातळी वाढायला लागली होती आणि पाणी कमरेच्यावर पोहोचले होते.

राजेशिर्के यांनी बस स्थानक सोडून जायचे नाही असे ठरवले. हातात असलेला एसटी प्रशासनाचा पैसा आणि बाहेरजी जीवघेणी परिस्थिती यामुळे राजेशिर्के यांच्यापुढे जीव आणि पैसा कसा वाचवायचा याचा विचार सुरू होता. अखेर त्यांनी सकाळी 6 च्या सुमारास एक शिवशाही बस हेरली आणि त्याचे टप गाठले. त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी याच बसच्या टपावर जमा होण्यास सांगितले. दुपारी 3 वाजेपर्यंत हे सगळेजण या बसच्या टपावर बसून होते. NDRF च्या पथकाला बस स्थानकात काही माणसे अडकल्याचे कळाले होते. या दलाचे जवान येईपर्यंत या मंडळींनी पावसाशी झुंज दिली. तब्बल 9 तास ही सगळी मंडळी राक्षसी पाऊस आणि वादळी वाऱ्याशी झुंजत बसून होती.

एसटीचे चालक 20 रूग्णवाहिका घेऊन चिपळूणात

रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने कोविड रूग्णांसाठी रूग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. पावसामुळे या रूग्णवाहिकांचे चालक कामावर येऊ शकले नव्हते. शनिवारी एसटीचे 20 चालक रूग्णवाहिका घेवुन चिपळूणकडे रवाना झाले आहेत. गुहागर आगारात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी 10 प्रवासी गाड्या रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय एसटीने एसटीचे दोन ट्रक एनडीआरएफच्या सामानाची नेआण करण्यासाठी पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आलं आहे.

चिपळुणात पूर ओसरू लागला, मदतकार्य वेगात; 1231 लोकांची सुटका

चिपळुणात आलेला महापूर आता ओसरू लागला आहे. पुरामुळे जबर नुकसान झाले आहे. मदतकार्य वेगात सुरू आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नगरपालिकेसह स्थानिक मच्छीमार आणि विविध संस्थांचे कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी झाले आहेत. महापुरात अडकलेल्या 1231 लोकांची आज सायंकाळपर्यंत सुखरूप सुटका करण्यात यश आले. अतिवृष्टी सुरूच असून खेडमधील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण ढिगाऱयाखाली अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन गुरुवारी चिपळूण शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. गुरुवारी सायंकाळपासून मदतकार्य हाती घेण्यात आले. एनडीआरएफची पथके पोहोचण्यापूर्वी तटरक्षक दल आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱयांसह स्थानिक मच्छीमार, रत्नदुर्ग माऊंटेनियर्स, राजू काकडे हेल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मदतकार्य हाती घेतले होते. पुराचे पाणी आज सकाळपासून ओसरायला सुरुवात झाली; परंतु मुसळधार पाऊस सुरूच असल्याने पाणी ओसरण्याचा वेग कमी आहे.

पिण्याच्या पाण्याचे टँकर अडकले

चिपळूणमध्ये आता पिण्याचे पाणी आणि अन्नाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते; परंतु ते रत्नागिरीच्या दिशेने येत असताना कोल्हापुरातील निळे येथे पुरामुळे अडकून पडले आहेत. तरीही उपलब्ध होईल तसे पिण्याचे पाणी, फरसाण, मेणबत्त्या आणि कपडे यांची मदत दिली जात आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोरोना सेंटरमधील 8 रुग्णांचा पुरात मृत्यू

चिपळूणातील अपरांत रुग्णालयात कोरोना सेंटर आहे. महापुराचे पाणी शिरल्याने सेंटरचा तळमजला बुडाला होता. व्हेंटिलेटर्समध्ये पाणी शिरल्याने या सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचवण्यासाठी एक बोट गेली होती; परंतु ती पाण्याच्या प्रवाहामुळे पलटी झाली. बोटीतील दोन जण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

खेडच्या बिरमणीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. खेडमधील बिरमणी गावातील मोरेवाडीत दरड कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन जण गाडले गेले. ढिगाऱयाखाली सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बिरमणी आणि पोसरे येथे एनडीआरएफ पोहचले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या