खरिपाच्या पेरणीचा हंगाम संपल्याने रोजगार घटला; कोरोना काळात बेरोजगारीच्या दराचा चढता आलेख

राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हळूहळू सर्व उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आली असली तरी एप्रिल महिन्यात अनलॉकच्या काळात राज्यातील बेरोजगारीचा दर 20. 9 टक्क्यांपर्यंत वाढला होता. पण त्यानंतर जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 3. 9 टक्क्यांपर्यंत आला. मात्र ऑगस्टमध्ये राज्यातील बेरोजगारीचा दर पुन्हा वाढून 6. 2 टक्क्यांवर गेला. आता अनलॉक पाचनंतर पुन्हा अर्थव्यवस्थेला गती मिळून रोजगाराच्या संधी पुन्हा निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.

राज्याच्या वित्त विभागाने राज्यातील बेरोजगारीच्या दराचा आढावा घेऊन सादरीकरण केले. त्यात मागील वर्षीच्या डिसेंबरपासून ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या काळातील बेरोजगारीच्या दरातील चढ उतार दर्शवले आहे. डिसेंबर 2019 मध्ये बेरोजगारीचा दर 4. 9 टक्के होता. जानेवारी महिन्यात हा दर पाच टक्क्यांवर गेला. मात्र फेब्रुवारीत पुन्हा 4.7 टक्के आणि मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले आणि बेरोजगाराची दर 5. 8 टक्क्यांवर गेला. एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर सर्वोच्च म्हणजे 20. 9 टक्क्यांपर्यंत गेला. पुढे मे महिन्यात 15. 5 टक्के, जूनमध्ये 9.2 टक्के, जुलैमध्ये 3. 9 टक्क्यांवर आला. मात्र ऑगस्टमध्ये 6. 2 टक्क्यांवर गेला.

बेरोजगारीचा दर वाढण्याची कारणे
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई संस्थेने मनरेगा योजनेतील कमी झालेली कामे आणि खरीपाच्या पेरणीचा संपुष्टात आलेला हंगाम ही दोन प्रमुख कारणांमुळे बेरोजगारीचा दर वाढण्याचे नमूद केले आहे.

कोरोना काळातही राज्याच्या कौशल्य विभागाने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यांमुळे 85 हजार 428 जणांना रोजगार मिळाला आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात 32 हजार 969 बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यामध्ये मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 20 हजार 805 जणांना रोजगार मिळाला. नाशिकमध्ये 2 हजार 244, पुणे 4 हजार 187, संभाजीनंगरमध्ये 3 हजार 128, अमरावतीमध्ये 1 हजार 293 व नागपूरमध्ये 1 हजार 312 जणांना रोजगार मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या