मोदींच्या हस्ते आठच महिन्यांपूर्वी झाले होते अनावरण
लोकसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून अनावरणाची घाई नडली!
निकृष्ट कामाला जबाबदार कोण?
पाऊस आणि वादळावर खापर फोडले; मालवणात उद्या जनआक्रोश मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी भरसमुद्रात उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला अजूनही दिमाखात उभा, पण महायुतीच्या भ्रष्ट राजवटीत मालवणातील राजकोट भागात उभारलेला पुतळा मात्र कोसळला
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मालवणातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आज कोसळला. आठ महिन्यांपूर्वीच 4 डिसेंबरला नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले होते. शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे वृत्त पसरताच अवघा महाराष्ट्र हळहळला. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून राज्यभरात मिंधे सरकारचा तीव्र निषेध होत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांनी या घटनेच्या निषेधार्थ मालवणातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. पुतळा निर्मितीची जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
स्वराज्यावर समुद्रमार्गे होणारे आक्रमण रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग उभारले, बलाढय़ आरमार उभारले. त्यामुळे स्वराज्यावर जलमार्गाने येणाऱ्या शत्रूला चाप बसला. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेले जलदुर्ग आजही सागराच्या लाटा अंगावर झेलत मजबुतीने उभे आहेत. सिंधुदुर्ग हा त्यातील सर्वात बलाढय़ आणि मजबूत जलदुर्ग आहे. ‘टोपीकर इंग्रजांच्या उरावरील ती शिवलंकाच’ असे त्याचे वर्णन केले जाते. तीन शतकानंतरही सिंधुदुर्ग छातीचा कोट करून समुद्रात उभा आहे. पण मिंधे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट येथे उभारलेला शिवरायांचा पुतळा वाऱ्याच्या झोताने आज कोसळला. लोकसभेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून पंतप्रधान मोदींच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले होते.
शिवरायांचा अपमान कदापि सहन करणार नाही
आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा देत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर हल्ला केला. निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ आठ महिन्यांतच कोसळलं. मिंधे सरकारची कंत्राटदारधार्जिणी राजवट याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करू आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे. त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही. आज जेव्हा आमच्या महाराजांचा पुतळा पडलेला पाहिला तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्या. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या मिंधे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं, असे ठणकावतानाच महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रतिमेला सांभाळायला हवं, अशी साद आदित्य ठाकरे यांनी घातली.
पुतळा बनवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे चौकाचौकात जाहीर करा
महापुरुषांचा पुतळा बनवताना दर्जा व अन्य बाबींचे काटेकोर पालन करायला पाहिजे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने सिंधुदुर्गावरील शिवपुतळा बनवताना त्याची काळजी घेतली नाही. पुतळा कोसळल्यानंतर शिल्लक राहिलेले अवशेष हे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला असून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे राज्यातील चौकाचौकात जाहीर करावीत, नाहीतर आम्ही त्यांच्या घरच्या पत्त्यांसह जाहीर करू, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.
पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्याचा – सुप्रिया सुळे
राजकोटवर पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले होते हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शिवरायांच्या पुतळय़ातही घोटाळा केला – जयंत पाटील
या पुतळय़ाच्या निर्माणकार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचे घेणेदेणे नाही. कमिशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढेच काम निष्ठेने सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली – काँग्रेस
कमिशनखोरीसाठी भाजप सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही. राजकोटवर छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाचे निकृष्ट बांधकाम करून भाजप सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
लाडका कंत्राटदार
राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यास मिंधे सरकारची लाडका पंत्राटदार योजना कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. पुतळा उभारण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ठाणे जिह्यातील शिल्पकार जयदीप आपटे यांना देण्यात आले होते. अवघ्या दोन महिन्यांत 35 फुटी पुतळा उभारण्यात आला. या पुतळय़ाच्या दर्जावर उद्घाटनाआधीच आक्षेप घेण्यात आल्याकडे भैया पाटील यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टक्केवारीत अडकलेल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुतळा बनविणारी व्यक्ती आणि तिच्या संस्थेला काळय़ा यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
महाराजांच्या किल्ल्यावर कोणत्या अधिकाराने बोलणार? – संभाजीराजे
मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला आणि घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यावर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी एक्सवरून सरकारला केला आहे.
हा शिवरायांचा घोर अपमान आहे – अंबादास दानवे
सिंधुदुर्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे हा शिवरायांचा घोर अपमान आहे. शिवरायांचे किल्ले आजही 350 वर्षांनंतर ऊन, वारा, पाऊस झेलून ताठ मानेने उभे आहेत. मात्र राजकोटवरील शिवरायांच्या पुतळय़ाचे डिझाईन एक पावसाळाही झेलू शकले नाही. शिवरायांच्या कर्तृत्वातून शिकणे आणि केवळ छत्रपती का आशीर्वाद… चलो चले मोदी के साथ असे ओरडणे यात फरक आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.
मिंध्यांनी टक्केवारीतून महाराजांनाही सोडले नाही – विजय वडेट्टीवार
सिंधुदुर्गसारख्या महत्त्वाच्या किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा तर तज्ञांची मदत घ्यायला हवी होती; परंतु मिंध्यांनी टक्केवारीसाठी शिवरायांनाही सोडले नाही. ठाण्यातील कंत्राटदाराला पुतळय़ाचे काम दिले होते, असा संताप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय फोडले
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही शिवसैनिकांसह राजकोट येथे जाऊन पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत असे सांगतानाच, शिवपुतळय़ाचे निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यानंतर वैभव नाईक यांनी याचा जाब विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. मात्र तत्पूर्वीच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पोबारा केला होता. त्यामुळे नाईक आणि संतप्त शिवसैनिकांनी कार्यालयाची तोडपह्ड केली.
राजे आम्हाला माफ करा…शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी वारा, पावसाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली. पुतळय़ाचे अवशेष पाहून शिवप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मने हेलावली, डोळय़ांमध्ये अश्रू तरळले. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला. शिवप्रेमींचा संताप पाहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मालवणात मागविण्यात आली आहे. पुतळय़ाच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सात वर्षे झाली, शिवस्मारकाची एक वीटही रचली नाही
महाराष्ट्र सरकार मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारक उभारणार होते; मात्र ते दूरच राहिले. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते. तेव्हा 2021 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र, 7 वर्षांत स्मारकाची एक वीटही रचली गेली नाही आणि दुसरीकडे आठ महिन्यांपूर्वी घाईघाईत राजकोट येथे उभारलेला शिवरायांचा पुतळा आज कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जे किल्ल्यावर शिवरायांचा भक्कम आणि टिकाऊ पुतळा उभारू शकत नाहीत ते समुद्रात टिकाऊ स्मारक कसे उभारणार, असा सवाल केला जात आहे.