मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार; तूर्तास वाद शमला

2461

अनेक घडामोडीनंतर मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ दिवसांनंतर रीतसर नियोजित जागी पुतळा पुन्हा बसवण्याची घोषणा करण्यात आली. पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामधील चर्चेनंतर हा तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे अखेर तूर्तास हा वाद शमला आहे.

ग्रामस्थांनी आठ दिवसानंतर पुतळा पुन्हा बसवण्यासाठी संमती दर्शवली आहे. त्यापूर्वी रविवारी दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. तसेच पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी महिलांनाही रस्त्यावर यावे लागले. मात्र आता आठ दिवसांनंतर पुन्हा पुतळा बसवण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून आठ दिवसात पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि गावातील पंच यांच्या बैठकीत घेण्यात आला.

मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हलवण्यात आल्याने वातावरण तापले होते. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तणाव निवळण्यासाठी तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, पंच मंडळी यांची बैठक रविवारी झाली. मणगुत् गावातती 5 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. पुतळा बसवण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. मात्र, रातोरात पुतळा हलविण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते.गावातील महिला, तरुण मोठ्या संख्येने गावातील चौकात जमले होते. गावातील मुख्य रस्ता पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखला होता. तेथे काही महिलांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढून शांतता प्रस्थापित केली. आता सर्वांच्या सहमतीने गावात पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येणार असल्याने तूर्तास वाद शमला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या