दापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी

629

छत्रपती शिवाजी महाराज तमाम देशवासीयांची अस्मिता आहे. राजापुर नंतर  चिपळुण पाठोपाठ आता दापोली येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी कला संचालनालयाची परवानगी मिळाली असून या पुतळ्याच्या सभोवतालील परिसर सुशोभिकरणासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तब्बल रुपये ७२ लाख इतक्या रक्कमेला मंजुरीही दिली आहे.

मागच्याचवर्षी राजापुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. याचे अनावरण शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा पुतळा आता राजापूर येथे येणार्‍या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनला आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाची निविदा  काढण्यात येणार असून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या पुतळ्या सभोवतालील परिसर सुशोभिकरणासाठी रुपये १ कोटीला या अगोदरच रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांनी मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर या ठिकाणी बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळ्याचा खर्चही ते स्वत: करणार आहेत.

आता याच धर्तीवर दापोली येथील कॅम्प दापोली, स.नं. ४४१ अ/१, सि.सि.नं.१९९७/१ मधील आरक्षण क्रमांक. १५ येथील आरक्षित जागेवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रेरणेतून व युवानेते योगेश कदम यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या सभोवतालील परिसराच्या सुशोभिकरणासाठी पालकमंत्री वायकर यांनी नगरोत्थानमधून तब्बल रुपये ७२ लाख  इतक्या रकमेला २०१९-२० मध्ये मंजुरी दिली आहे. हा पुतळा बसविण्याचे काम वेगाने पुर्ण व्हावे यासाठी कला संचालनालयाकडून तात्काळ परवानगी मिळावी, अशी विनंतीही दापोली नगरपंचायतीने पालकमंत्री यांना करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री वायकर यांनी पुढाकार घेतल्याने कला संचालनालयाने कागदपत्रांची तपासणी करुन तात्काळ परवानगीही दिली. दहिसर येथील शिल्पकार उत्तम पाचारणे पुतळा साकारत आहेत. त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीस संचालनालयाची मान्यता मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या