मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सातरस्ता जंक्शनवर असलेल्या श्री संत गाडगे महाराज पुतळय़ाची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या पुतळय़ाचा रंग अनेक ठिकाणी उडाला असून पुतळय़ाचा चेहराही काळवंडला आहे. पुतळय़ावरील मेघडंबरीवर छोटी झाडे उगवली असून पुतळय़ाच्या परिसरात अस्वच्छताही पसरली आहे. शिवाय पुतळय़ालगतच्या भिंतींचा रंगही काळवंडला आहे. यातच 20 डिसेंबरला श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने डागडुजी, रंगरंगोटी आणि स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश आयरे यांनी केली आहे.