मंत्रालयाच्या पायऱ्यांवर हातोडा पडणार

30

सामना ऑनलाईन, मुंबई

मंत्रालयाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाच्या प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात आलेल्या आणि एशियाटिक लायब्ररीची आठवण करून देणाऱ्या पायऱ्यांवर आता हातोडा पडणार आहे. केवळ १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन वगळता या पायऱ्यांचा काहीच उपयोग होत नसल्याने या पायऱ्या नेमक्या कशासाठी बांधण्यात आल्या, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या पायऱ्यांचे करायचे काय, याची डोकेफोडी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता त्या तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

मंत्रालयाला लागलेल्या आगीत मुख्य इमारतीचे चार मजले जळून खाक झाले होते. त्यामुळे मुख्य इमारतीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्यानुसार कामही हाती घेतले. नूतनीकरणादरम्यान मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वाराऐवजी थेट पहिल्या मजल्यावरून चौकशी करून प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या उभारून त्या थेट पहिल्या मजल्याला जोडण्यात आल्या.

लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या पायऱ्यांमुळे एशियाटिक लायब्ररीची आठवण होऊ लागली. आघाडीचे सरकार जाऊन युतीचे सरकार आले. पण पायऱ्यांचा वापर करण्याचे नियोजन फसल्याने अनेक वर्षांनंतरही या पायऱ्यांचा काहीच उपयोग केला जात नाही आहे. त्या केवळ शोभेसाठी राहिल्या आहेत. या पायऱ्यांखाली वाहने पार्ंकग केली जातात. या पायऱ्यांचा काहीच उपयोग होत नसल्याने त्या आता तोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या