शेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला

कोरोना महामारीच्या संसर्गाची दुसरी लाट आल्याच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड सुरू आहे. मुंबई शेअर बाजारात सहाव्या दिवशीही घसरगुंडी सुरूच असून, गुरुवारी सेन्सेक्स तब्बल 1115 अंकांनी गडगडला. यामुळे सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 11.31 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. दुसरीकडे निफ्टीचाही बाजार उठला आहे.

4 मे रोजी सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला होता. त्यानंतर साडेचार महिन्यांनी एका दिवसात सर्वांत मोठी 1115 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

कशी झाली पडझड…

  • मुंबई शेअर बाजार उघडताच, सेन्सेक्स गडगडायला सुरुवात झाली. दिवसभरात सेन्सेक्स 1115 अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 36 हजार 550 अंकांवर स्थिरावला होता.
  • सलग सहा दिवसांत सेन्सेक्स 2749.25 अंकांनी कोसळला आहे.
    सलग सहा दिवस सेन्सेक्सची पडझड झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे 11.31 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
  • निफ्टीचा सेन्सेक्स 326 अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 10805 अंकांवर स्थिरावला होता.
  • बीएसई इंडेक्सवर सगळे शेअर लाल निशाण्यावर होते. इंड्सइंड बँकेचे शेअर 7.10 टक्क्यांनी घसरले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस, ऑफिस बँक, आयसीआयसीआय, मारुतीच्या शेअरमध्ये घसरण.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत

  • कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याची भीती ब्रिटनसह युरोपात आहे. त्याची दहशत जगभरातील शेअर बाजारात पाहायला मिळाली.
  • दक्षिण कोरियातील शेअर बाजार 2.59 टक्क्यांनी घसरला. शांघाय, टोकियो, हाँगकाँग शेअर बाजारात 1.82 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.
आपली प्रतिक्रिया द्या