ऑस्ट्रेलियाचा कसून सराव, अध्यक्षीय इलेव्हनवर दणदणीत विजय

19

सामना ऑनलाईन, चेन्नई

हिंदुस्थान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने एकमेव एकदिवसीय क्रिकेट सराव सामन्यात कसून सराव करताना हिंदुस्थान बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन संघावर १०३ धावांनी दणदणीत विजय मिळविला. डेव्हिड वॉर्नर, कर्णधार स्टीव्हन स्मिथ,ट्रविस हेड, मार्कस स्टोईनिस या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अर्धशतके झळकाविली. हिंदुस्थानकडून एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अध्यक्षीय इलेव्हन संघ ४८.२ षटकांत २४४ धावसंख्येवर गारद झाला. अध्यक्षीय इलेव्हनकडून आघाडीवीर श्रीवत्स गोस्वामी (४३), मयांक अग्रवाल (४२), अक्षय कर्णेवार (४०) व कुशांग पटेल (नाबाद ४१) यांनीच फक्त ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा प्रतिकार केला. मात्र मोठी खेळी करण्यात कोणीच यशस्वी न ठरल्याने अध्यक्षीय इलेव्हन संघाला हार पत्करावी लागली. ऑस्ट्रेलियाकडून ऍस्टोन एगरने सर्वाधिक ४ फलंदाज बाद केले. केन रिचर्डसनने २, तर जेम्स फॉकनर, ऍडम झम्पा व मार्कस स्टोईनिस यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३४७ धावसंख्या उभारली. वॉशिंग्टन सुंदर व राहिल शाहवगळता अध्यक्षीय इलेव्हनच्या सर्वच गोलंदाजांची कांगारूंनी धुलाई केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या