धावत्या लोकलवर दगड फेकल्याने महिला जखमी

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर चेंबूर ते गोवंडी स्थानकांदरम्यान अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावल्याने एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली.

सीवूड येथे राहणाऱया अश्विनी शेरे यांनी कामावरून घरी जाण्यासाठी कुर्ला येथून लोकल पकडली. अपंगांच्या डब्याशेजारी बसलेल्या शेरे यांच्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास चेंबूर ते गोवंडीदरम्यान अचानक दगड आदळल्याने त्यांच्या कपाळावर जखम झाली. त्यांना इतर महिलांनी वाशी येथे उतरवून तेथील वन रूपी क्लिनिकमध्ये नेले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात येऊन तीन टाके टाकण्यात आल्याचे वन रूपी क्लिनिकचे डॉ. राहुले घुले यांनी सांगितले. आधी आम्हाला वडाळा जीआरपीमध्ये केस नोंदवा, असे सांगितले, नंतर वाशीला जाण्यास सांगितले. माझ्या पत्नीस चक्कर येत असल्याने आपण तिला घरी पाठविले असून तक्रार दाखल करण्यास वाशी जीआरपी पोलीस ठाण्यात गेलो असल्याचे त्यांचे पती अविनाश शेरे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या