भिवंडीत धर्मांधांची पोलिसांवर तुफान दगडफेक

36

सामना वार्ताहर । भिवंडी

गोमांस आणि कत्तलीसाठी आणलेल्या गाईंचा ट्रक व कार ताब्यात घेतल्याने भिवंडीत मुस्लिमांच्या जमावाने थेट पोलिसांवर हल्ला केला. पोलीस पथकावर तुफान दगडफेक करीत त्यांनी ट्रकमधील गाईंना पळवून लावले. या हल्ल्यात दोन महिला कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पडघा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ६ कसायांना अटक करण्यात आली आहे.

घोटी-जुन्नर या परिसरातून कत्तलीसाठी गाईंचा ट्रक पहाटेच्या सुमारास पडघ्याजवळील बोरिवलीतील कत्तलखान्यात नेण्यात येत होता. त्याची माहिती बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्यावेळी ट्रकमधून गाईंना खाली उतरविण्यात येत होते. अचानक टाकलेल्या छाप्याने कसाई संतप्त झाले व त्यांनी थेट बोरिवली गावात जाऊन गावकऱ्यांना बोलावून आणले. या जमावाने पोलिसांवरच दगडफेक करीत हल्ला सुरू केला. यावेळी प्रचंड बाचाबाची तसेच हमरीतुमरी झाली. या धुमश्चक्रीत कत्तलखान्यामध्ये असलेल्या ३४ गाईदेखील पळून गेल्या.
मुस्लिमांच्या या हल्ल्यात के. सी. चलवादी व सी. एस. पवार या दोन महिला कॉन्स्टेबल जखमी झाल्या. याप्रकरणी मोहम्मद शेख, साबीर खान, समीर शेख, महागीर शेख, शानू पठाण या कसायांना अटक करण्यात आली आहे. काही हल्लेखोर पळून गेले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी ६५० किलो गोमांस तसेच दोन कार जप्त केल्या असून या घटनेमुळे भिवंडीत तणाव निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या