मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’वर दगडफेक

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे वंदे भारत एक्प्रेसने प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झालेले नाही. या गाडीवर दुसऱयांदा दगडफेकीची घटना घडली आहे.

मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱया वंदे भारत एक्स्प्रेसवर दौंड ते कुर्डूवाडीदरम्यान जेऊरजवळ जिंती येथे रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामध्ये गाडीच्या पुढून दुसऱया डब्याच्या काचेची तावदाने तुटली आहेत. या दगडफेकीमुळे घबराटीचे वातावरण आहे. याआधी 24 एप्रिल रोजी याच मार्गावर वंदे भारत एक्प्रेसवर पुण्यानजीक हडपसर-लोणी येथे अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. त्यात चार डब्यांच्या खिडक्यांची तावदाने फुटली होती. वारंवार होणाऱया दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.