हिंगोलीत पसरला अंधार

108

योगेश पाटील । हिंगोली

साडे सहा कोटी रुपयांच्या थकीत विजबिलापोटी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने नगर परिषदेच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे हिंगोलीतील रस्त्यांवर अंधार पसरला आहे. सर्व थकबाकी भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका महावितरणने घेतली आहे. त्यामुळे नगरपालिका व प्रशासनाची कोंडी झाली आहे. रात्रीच्या अंधारात हिंगोलीकरांना चाचपडत राहवे लागत असून ’अच्छे दिन’चाही फज्जा उडाला आहे.

हिंगोली शहरातील पथदिव्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. या वीजदेयकाची थकबाकी साडे सहा कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्याचसोबतच हिंगोली शहरातील पाणी पुरवठ्याचे देखील २५ कोटी रुपयांचे थकबाकी असल्याचे समोर येत आहे.

या संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनदेखील थकबाकी भरली जात नव्हती, काही ना काही सबब मागून नगरपालिका प्रशासन वेळ मारुन नेत होते, पंरतु फेब्रुवारी महिना संपत आला तरीदेखील थकबाकी भरली न गेल्याने महावितरणाने ही कारवाई केली आहे. हिंगोलीचे आमदार, नगराध्यक्ष आणि पालकमंत्री भाजपचे असुन राज्यात भाजपचे उर्जामंत्री आणि मुख्यमंत्री असताना देखील हा प्रश्न का सुटत नाही ? असा प्रश्न हिंगोलीकरांकडून विचारण्यात येत आहे. ‘आपलं सरकारं, कामगिरी दमदार’ अशी जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपच्या राज्यात पसरलेला अंधार हीच दमदार कामगिरी आहे का ? असा सवालही आता हिंगोलीकर विचारत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या