फोडा आणि झोडा या वृत्तीने राज्य करता येणार नाही; शिवसेनेने ठणकावले

106

सामना ऑनलाईन। पुणे

शेतकऱ्यांच्या राज्यातील अभूतपूर्व आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस सरकार प्रचंड चिंतेत पडलं आहे. हा संप मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर आम्ही कर्जमाफी देण्याबाबत अभ्यास सुरू केला असल्याचं सांगत आंदोलन संपलं असं जाहीर करून टाकलं. मात्र त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांचा वापर संप फोडण्यासाठी होतोय असा संशय शेतकऱ्यांना आला आणि त्यांनी संपाची,आंदोलनाची भूमिका कायम ठेवली. या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहीलेल्या शिवसेनेने आज फडणवीस सरकारला ठणकावून सांगितलं आहे की फोडा,झोडाच्या वृत्तीने तुम्हाला राज्य करता येणार नाही.

सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यानंतर आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना बाणेदारपणे  कर्जमाफीसंदर्भात शिवसेनेची भूमिका समजून घेतलीच पाहीजे असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी शिवसेनेचीही भूमिका जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं. याबाबत बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला प्रश्न विचारला आहे की जी शिवसेना सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहीली, ज्या शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अभियान राबवलं त्या शिवसेनेला तुम्ही वगळून चर्चा करणार आहात का ? का तुम्ही शेतकऱ्यांना ‘साले’ अशी शिवी देणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्याबरोबर चर्चा करणार आहात ? हा प्रश्न अत्यंत गंभीर असून तो संयमाने सोडवला पाहीजे, फोडा झोडा या मार्गाने राज्य करता येणार नाही असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राप्रमाणेच मध्यप्रदेशमध्ये देखील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनात ५ शेतकऱ्यांचा बळी गेला. या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकी १ कोटी रूपये आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. याला संवेदनशीलता म्हणतात असं म्हणत संजय राऊत म्हणाले की त्यांच्याकडून आपण काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे.

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, या भेटीमध्ये त्यांनी कर्जमाफीच्या मुद्दावर चर्चा केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी खरोखर कर्जमुक्तीवर चर्चा केली का राष्ट्रपतीपदाबाबत चर्चा झाली माहिती नाही.  काही लोकं आंदोलनापासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत असं राऊत यांनी म्हटलं आहे, मात्र शिवसेनेचा फोकस हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.

गेल्या काही दिवसांपासून मध्यावधी निवडणुका होणार अशी आवई कोणीतरी उठविली आहे. हा धागा पकडत पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला यावर बोलताना ते म्हणाले की निवडणुका हेच काम सरकारला उरलंय का? तुमच्याकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही मग तुम्ही हजारो कोटी रूपये खर्चून निवडणुकीला तयार आहात का?  राऊत म्हणाले की ज्यांना कर्जमाफीचं श्रेय घ्यायचं त्यांनी ते खुशाल घ्यावं मात्र गोलमाल उत्तरं देणं बंद करा आणि एका प्रश्नाचं सरळ उत्तर द्या की तुम्ही कर्जमाफी देणार आहात की नाही?

आपली प्रतिक्रिया द्या