शिवसेना पदाधिकाऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे थांबवा

9

सामना प्रतिनिधी । जालना

जालना जिल्ह्यातील शिवसैनिकांवर, शिवसेना पदाधिकाऱ्यांवर राजकीय दबावात दाखल होणारे गुन्हे व विशिष्ट अधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांना दिला जाणारा त्रास थांबविण्यात यावा, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांची भेट घेवून दिले आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात मागील काही काळापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे मनोबल तुटावे या हेतूने राजकीय दबावात काही पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. विशेषत: भोकरदन तालुक्यातील आपली जमीन रितसर मोबदला देवून संपादन न केल्याने शेतकऱ्यांसह शिवसेनेचे कैलास पुंगळे यांनी आधी मोबदला द्या व मग काम सुरु करा. या मागणीसाठी रस्ता करणाऱ्या शासकीय एजन्सीस लोकशाही मार्गाने काम थांबविण्याची विनंती केली. यावरुन यंत्रणेने जमीन संपादनाची कारवाई केली आहे काय, याची चौकशी न करता कैलास पुंगळे व शेतकऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा आणणे व इतर अशा स्वरुपाचे गुन्हे हसनाबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी दाखल केले आहेत.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधव हिवाळे हे एका प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये माहिती घेण्यासाठी गेले असता माधव हिवळे हे एका राजकीय पक्षाचे तालुकाप्रमुख आहेत व ते जनतेच्या कामासाठी त्यांना वारंवार पोलीस ठाण्यात जावे लागते. यावरुन तू सारखा पोलीस स्टेशनमध्ये का येतोस, असा वाद घालून हसनाबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी माधव हिवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. हिवाळे हे भोकरदन पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिलेले असतांना व लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतानांही त्यांना एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे हातकड्या घालून न्यायालयात हजर करण्यात आले.

भोकरदन तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करुन त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम करणे बंद करावे यामुळे शिवसेना पक्षाची तेथे वाढ होणार नाही या हेतूने हा राजकीय दबाव पोलीस अधिकाऱ्यांवर आणला जात आहे.

भोकरदन तालुक्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ सेवेचा झाला असतांनाही व बदली आदेश प्राप्त झाल्यानंतरही संबंधीत अधिकारी आपली बदली रद्द होण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा वापर करतात. याची चौकशी व्हावी. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी गुन्हा करीत असेल तर त्यावर निश्चित कारवाई करावी. परंतु ही कारवाई करतांना शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करु नये. सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांना सारखीच वागणूक द्यावी. जेणे करुन पोलीस दलाची निःपक्ष प्रतिमा सामान्य माणसाच्या मनात निर्माण होईल, असेही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्वत, रमेश गव्हाड, भगवान कदम, परमेश्वर जगताप, नवनाथ दौड, कैलास पुंगळे, माधव हिवाळे, उत्तमराव वानखेडे, सुरेश तळेकर, किरणराजे कोथळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या