विल्होळी खत प्रकल्पाचे प्रदूषण रोखा, आमदार घोलप यांची विधिमंडळात मागणी

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक तालुक्यातील विल्होळीजवळील खत प्रकल्पामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून, रसायनमिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदुषणातून शेतकऱ्यांची मुक्तता करावी, अशी मागणी शिवसेना आमदार योगेश घोलप यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली.

सन २०००मध्ये विल्होळी येथे खतप्रकल्प उभारण्याला शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीक्र विरोध केला. त्या जनआंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले होते. तरीही महापालिकेने याच ठिकाणी खतप्रकल्प उभारला. या प्रकल्पामुळे रसायनमिश्रीत पाणी वालदेवी व दारणा नदीपात्रात मिसळून पाणी प्रदूषित झाले आहे, याची डिसेंबर महिन्यात आमदार योगेश घोलप यांनी पाहणी केली, मात्र प्रशासनाने संबंधित तक्रारींकडे दुर्लक्षच केले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अंगावर पांढरे ठिपके पडले आहेत, याकडे आमदार घोलप यांनी विधीमंडळ अधिवेशनात लक्ष वेधले. येथील शेतीनुकसानीची भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करीत संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, शेतकऱ्यांसह स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कायमस्वरुपी तोडगा काढणार

या खत प्रकल्पाच्या रसायनमिश्रीत पाण्याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येईल, शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शासन लक्ष देईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितल्याची माहिती आमदार घोलप यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या