विषमुक्त अन्न – काळाची गरज

dr-namrata-bharambe>>डॉ. नम्रता महाजन भारंबे

२-३ महिन्यांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये एक बातमी झळकली होती. ‘किटकनाशके फवारणीमुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू व ४९ शेतकरी अत्यवस्थ’, ही बातमी होती महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील. अशा घटना महाराष्ट्राबाहेर देखील आहेत. पण आपण अशा बातम्यांकडे किती जाणीव पूर्वक बघतो?

साधारणपणे ५० वर्षांपूर्वी (१९६७-६८ ते १९७७-७८) हिंदुस्थानमध्ये हरितक्रांती घडून आली व भारत सुजलाम सुफलाम बनला. अन्न-धान्याचा तुटवडा संपून समृद्धता आली. या हरितक्रांतीमध्ये शेतामध्ये रासायनिक खते, किटकनाशके, उत्पादनवाढीसाठी संकरीत वाणाचे बी-बियाणे यांचा वापर सुरू झाला. मग आता नेमके काय झाले? आधुनिकीकरण होत असतांना शेतीमध्ये अधोगती का होत आहे? हे वाचताना कदाचित असं वाटू शकतं की आपला याच्याशी काय संबंध? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर, थांबा! कारण याचा थेट संबंध आपल्याशी आहे; आपल्या आरोग्याशी आहे. आयुर्वेदामध्ये अन्नाला औषध मानले आहे. अॅलोपॅथीचे जनक हिप्पोक्रेट्स यांनी देखील ”Let food be thy medicine and medicine be thy food” असे म्हटले आहे.

हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीच्या हव्यासापायी बेसुमार खतांचा व किटकनाशकांचा उपयोग सुरू झाला. खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणार धान्ये, फळे, भाज्या यांच्यामध्ये रासायनिक खते व किटकनाशकांचे अंश उरतात. खतांमधील रासाययिक अंश व किटकनाशकांमधील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोहचतात व शरीराला अपाय करतात. या खतांमुळे फक्त अन्नधान्यच दूषित होत आहे असे नाही, तर त्यामुळे पाणी, हवा देखील दूषित होत आहे. किटकनाशकांमुळे शेतांमध्ये मधमाश्या येत नाही. मधमाश्या या बीजप्रसारासाठी आवश्यक असतात. एकूणच निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी, जीवनशैलीशी निगडीत मधुमेह, स्थौल्य, हृदयरोग इ. विकार, हॉर्मोन्सचे असंतुलन, वंध्यत्व या सर्व आजारांचे मूल आपल्या आहारात दडलेले आहे. पंजाबमधील भटिंडा ते राजस्थान मधील बिकानेर शहरामध्ये धावणारी ‘कॅन्सर ट्रेन’ हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. ही ट्रेन १२ डब्यांची आहे आणि आता येथे अजून एका ट्रेनची गरज आहे. हीच कथा केरळ मधील ‘कासारगोड’ जिल्हाची. काजूच्या झाडांवर हेलिकॉप्टर मधून एंडोसल्फानची फवारणी करण्यात आली होती. याच्या विषाची झळ अजूनही तेथील लोक सोसत आहेत.

प्रत्येक गोष्ट पारखून घेणारे आपण भाजीपाला-फळे, डाळी, धान्य, तेल, तूप, दूध, साखर, गुळ इ. रोजच्या खाण्याच्या वस्तू आपण पारखून घेतो का? या गोष्टी ब्रॅण्डेड असण्याचा हट्ट आपण धरतो का? या सर्व गोष्टी नेमक्या कुठे, कशा पिकतात किंवा तयार होतात? त्यासाठी नैसर्गिक खते व किटकनाशके वापरली आहेत की रासायनिक? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता आवश्यक झाले आहे.

ग्राहकांनी विषमुक्त अन्नाची मागणी करणे व शेतकऱ्यांनी देखील विषमुक्त अन्नाचा पुरवठा करण्याचा संकल्प करावा आणि येणारे वर्ष आरोग्यदायी करण्याकडे एक यशस्वी पाऊल टाकावे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected] 

फोन क्र. ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या