कथा..सापशिडी

अनुराधा राजाध्यक्ष, anuradharajadhyaksha@gmail.com

नेहमीच कुठे होतं आपल्या मनासारखं… अशावेळी आपला आधार आपणच व्हायचे असते…

खूप दमून भागून ती घरी आली होती. पण दिवसभरात एकही काम झालं नव्हतं. काम न होण्यापेक्षा माणसांच्या दुटप्पी वागण्याचा जास्त त्रास झाला होता तिला.. त्यामुळेच शरीरापेक्षा मनानं दमली होती ती…

ती घरी आली, तेव्हा तिचा चार वर्षांचा मुलगा तिला पटकन म्हणाला, ‘आई, सापशिडी खेळूया?’

सापशिडी… दान हवं तसं पडलं तर शिडीसुद्धा मिळते वर चढायला आणि ईप्सित साध्य होतं… पण असं वर चढत असताना अचानक साप येतो आणि सगळी स्वप्नं धुळीला मिळवतो… मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न…

आज दिवसभरात हाच स्वप्न धुळीला मिळण्याचा जीवघेणा खेळ खेळून ती घरी आली होती आणि मुलगा पुन्हा विचारत होता, ‘आई सापशिडी खेळशील?’ त्याचं काही चुकलं नव्हतं… दिवसभर घराबाहेर राहिल्यानंतर आईनं घरी आल्यावर आपल्याला वेळ द्यावा असं त्याला वाटलं तर त्याचं काहीच चुकलं नव्हतं… तिलाही याची कल्पना होतीच… घर आणि तिचं करीअर या दोन्हीचा ताळमेळ घालण्याचं तंत्र तिला चांगलंच साधलं होतं… करीअरपायी मुलाकडे, घराकडे दुर्लक्ष करणं तिला पटायचं नाही… म्हणूनच मुलाशी असलेला तिचा संवाद सुटला नाही… मुलाला किती वेळ देतो यापेक्षा तो कसा देतो याकडे ती जाणीवपूर्वक लक्ष देत असल्यामुळे मुलाची आणि तिची छान मैत्रीसुद्धा होती… त्याच्याबरोबर त्याच्या वयाचं होऊन खेळणं तिला जमायचं… आणि हेच तर त्यालाही आवडायचं…

पण तो दिवस वेगळा होता… मुलाबरोबर नेहमी देतो तसा वेळ द्यायला हवा याची जाणीव असल्यामुळेच, मन शिणलेलं असूनही ती त्याच्याबरोबर नेहमीप्रमाणेच खेळायला बसली… का कोण जाणे, बाहेरच्या जगात सगळेच विपरीत अनुभव त्या दिवशी तिच्या वाटय़ाला आलेले असूनही मुलाशी खेळताना मात्र सापशिडीच्या खेळात सगळीच दानं तिच्या बाजूनं पडत गेली… आणि म्हणता म्हणता तिनं तो डाव जिंकलासुद्धा… खरं तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे मुलाबरोबर खेळताना त्याला बरं वाटावं म्हणून ती मुद्दाम हरायची… कारण तो जिंकताना स्वतःची हार पत्करायला तिला मजा वाटायची, पण त्या दिवशी तिचं चित्त थाऱयावर नव्हतं… दिवसभराचे सगळे नकार पचवताना सापशिडीच्या त्या खेळात का होईना, आपण जिंकत असल्याचा आनंद तिची अस्वस्थता दूर करत होता… ती १०० च्या घरात पोहोचली आणि तिनं मुलाकडे पाहिलं… आज आपली आई नेहमीसारखी वागत नसल्याचं तर त्यालाही कळलं होतं… हरण्यापेक्षाही आपली नेहमीची आई हरवल्यानं तो रडवेला झाला होता… त्याचा उतरलेला चेहरा बघून तिला मनात कुठेतरी खोलवर वाईटही वाटलं… पण मग हेच निमित्त साधून वास्तवाचं भान त्याला द्यावं असं वाटून ती पटकन बोलून गेली, ‘अरे असंच असतं… आपल्याला नेहमीच सांभाळून घेत नाही कुणी… कधी कधी दान आपल्याला हवं तसं पडतच नाही… आणि आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळतच नाही… पण ते पचवण्याची ताकद यायला हवी आपल्यात. म्हणूनच तर असतात हे खेळ…’

खरं तर चार वर्षांच्या मुलाच्या मानानं तिचं हे सगळं बोलणं खूपच प्रौढत्वाकडे झुकणारं होतं… या चार वर्षांच्या मुलाला आपलं हे तत्त्वज्ञान कसं कळणार हेही तिच्या लक्षात तेव्हा आलं नाही… त्या दिवशी ती दुखावलेल्या मानसिक अवस्थेत स्वतःची समजूत घालावी तशी  मुलासमोर व्यक्त होत गेली हेच खरं. बोलता बोलता ती म्हणाली, ‘जेव्हा संकटं कोसळतात ना आपल्यावर, तेव्हा तिथे आई नसते, कुणीच नसतं आधार द्यायला, सांभाळून घ्यायला. याची तुलाही सवय व्हावी म्हणून आज नाही सांभाळून घेतलं मी तुला… कारण अशावेळी कोणीच नसतं आपल्या डोक्यावर मायेनं हात ठेवायला… तुझ्याही बाबतीत असंच झालं तर काय करशील तू?’

‘कोणी कशाला हवं? आपले दोन हात असतात की, ते ठेवायचे आपणच आपल्या डोक्यावर…’ मुलानं निरागसतेनं उत्तर दिलं… आणि तेच तिच्या मनातल्या वादळाला शांत करत गेलं… खरंच की, कशाला हवं कुणी आधार द्यायला, आपले आपणच पुरेसे असतो की आपला आधार बनायला…

ती प्रसन्न हसली आणि मुलाला जवळ घेत त्याचे भराभर मुके घेत राहिली… आपल्या आईच्या डोळ्यातून हसता हसता पाणी का गळतंय याचं उत्तर आईच्या प्रश्नाचं सहजतेने उत्तर देऊ शकणाऱया त्या चिमुरडय़ाकडे नव्हतं. त्याची हरवलेली आई त्याला सापडली होती, एवढंच त्याला कळत होतं…