नशिबाचा देव

111

<नीलेश मालवणकर>

आले का बाबा?’ घरात शिरणाऱया परशाने आईला विचारलं.

‘हो.’

‘झाला का पैशांचा बंदोबस्त?’

‘त्यांनाच विचार.’

अर्थ स्पष्ट होता. कॉलेजच्या फीची आजही काही सोय झालेली दिसत नव्हती.

परशाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

बाबा नेहमीप्रमाणे देवघरात कनकेश्वराच्या मूर्तीपुढे भक्तिभावाने बैठक मारून बसले होते.

परशाची चाहूल लागली तसं त्यांनी मागे वळून पाहिलं.

‘काय झालं माझ्या फीचं?’ परशाने विचारलं.

‘अंए ए बेटा त्याचं असं झालं…’

‘म्हणजे पैशांचा बंदोबस्त नाही झाला तर…’

बाबांच्या चेहऱयावर ओशाळे भाव आले.

‘काळजी करू नकोस. कनकेश्वराच्या कृपेने…’

परशाच्या डोक्यात तडक गेली. लहानपणापासून तो हेच ऐकत आला होता. बरोबरच्या मुलांच्या खेळण्यांकडे, नव्या कपडय़ांकडे परशा आशाळभूतपणे पाहत राहायचा. बाबांकडे  पैसे मागितले की ते कनकेश्वराचं नाव घेऊन सबुरीचा सल्ला देत असत. त्यांचा पिढीजात सोनाराचा धंदा व्यवस्थित चालत नव्हता. परशाचे वडील कनकेश्वराच्या भक्तीत आकंठ बुडालेले. धंद्याकडे लक्ष कमीच. लोकही पुरेपूर गैरफायदा घेत.

परशाच्या घराण्यातल्या कुण्या पूर्वजाने नाणेगाव संस्थानच्या महाराजांचा जीव वाचवला होता. महाराजांकडून त्यांनी धन स्वीकारायला ठाम नकार दिला म्हणून महाराजांनी त्यांना अतिशय देखणी कनकेश्वराची मातीची मूर्ती भेट दिली होती. तो कनकेश्वर दिसायला तुंदिलतनु, पण चर्येवरील भाव अतिशय प्रसन्न आणि हसरे.

‘हा नशिबाचा देव’ महाराज परशाच्या पूर्वजाला म्हणाले होते, ‘याची नित्यनियमाने पूजा करा. हा घरात असेल तोपर्यंत तुम्हाला नशीब साथ देईल.’

परशाचा या आख्यायिकेवर विश्वास नव्हता. त्याने जन्मल्यापासून दारिद्रय़ाचाच अनुभव घेतला होता.

परिस्थितीशी झगडत तो शिकला आणि आता कॉलेजच्या फीचीदेखील विवंचना.

परशाचं डोकं फिरलं. ‘बास झालं तुमचं कनकेश्वरपुराण. नशीबाचा कसला, हा तर कमनशिबाचा देव आहे. पुरे झाले याचे लाड. काही गरज नाही याला पुजायची.’

वडील अडवणार तोपर्यंत परशाने कनकेश्वराची ती जड मूर्ती उचलून बाहेर भिरकावून दिली.

खणकन मातीची मूर्ती फुटली पण आवाज मात्र धातूच्या खणखणाटाचा आला. साऱयांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. मूर्तीच्या तुकडय़ांमध्ये कित्येक पिवळसर रंगाच्या मुद्रा पसरल्या होत्या. परशाच्या बाबांनी एक मुद्रा उचलली आणि बारकाईने निरखली. सोनं. नक्कीच सोनं. ती सोनाराची नजर होती.

परशाची नजर कनकेश्वराच्या चेहऱयाकडे गेली. देहाचे तुकडे झाले तरी चेहरा अभंग होता. कनकेश्वर… तो नशीबाचा देव परशाकडे पूर्वीप्रमाणेच हसऱया नजरेने पाहत होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या