देवीच्या शक्तिपीठांची व्युत्पत्तीकथा

सामना ऑनलाईन । मुंबई

नवरात्र हा दुर्गेचा, शक्तिचा, सृजनाचा उत्सव. ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे तीनही देव प्रकृतीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तत्वांचे कारक आहेत. यातील महेश म्हणजे शिवशंकर ही देवता विनाशक मानली जाते. जगात जे जन्माला आले आहे ते कधीतरी नष्ट होणार या प्रकृतीच्या नियमाचे नियमन करणारी देवता म्हणजे शिव. पण, जे नष्ट झाले ते पुन्हा नवीन रूपात जन्माला येणार हाही प्रकृतीचा नियम. कदाचित त्यामुळेच शिवाचे अर्धांग हे शक्तीचे असते. हीच दुर्गा, नवीन जीवन देणारी शक्ती. म्हणजेच लयानंतर पुन्हा उत्पत्ती होते आणि त्याच उत्पत्तीचा सृजनाचा उत्सव म्हणजेच नवरात्र.

नवरात्र म्हटली की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. घट बसतात, त्यांची पूजा केली जाते, गरब्याच्या रूपाने रात्र जागवत देवीची आराधना केली जाते. या उत्सवाच्या काळात भक्तांची सगळ्यात जास्त गर्दी देवीच्या शक्तिपीठांमध्ये असते. कोल्हापूर, तुळजापूर, वणी आणि माहूर ही महाराष्ट्रातली साडेतीन शक्तिपीठं. पण, फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात तब्बल ५१ शक्तिपीठं आहेत. ही शक्तिपीठं नेमकी कशी उत्पन्न झाली? नेमकी ही विशिष्ट ठिकाणंच शक्तिपीठ म्हणून का ओळखली जातात..? या प्रश्नांची उत्तर देणारी एक कथा पुराणांत सांगितली जाते. ती कथा पुढीलप्रमाणे-

दक्ष हा प्रजापती आणि अदितीचा पुत्र, मनु प्रजापतीची कन्या, प्रसुती ही दक्षची पत्नी. प्रसुती या पत्नीपासून दक्षाला एकूण १६ कन्या झाल्या. त्यापैकी श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, प्रिया, उन्नती, बुध्दी, मेधा, तितिक्षा, आपि, मूर्ती या कन्या दक्षाने धर्मप्रजापतीला दिल्या. स्वाहा अग्नीला दिली, स्वधा आणि अग्नी आप्तांना आणि सती नावाची कन्या शंकर या देवाला दिली. दक्ष प्रजापती एकदा नैमिषारण्यात गेला असताना सर्व देवांनी व ऋषींनी त्याचा आदर सत्कार केला. परंतु शंकर देवाने दक्षाच्या आदर सत्कारात भाग घेतला नाही. दक्ष प्रजापतीला शंकराची म्हणजेच जावयाची ही वर्तणूक आवडली नाही व त्याने भगवान शंकराचा सूड घेण्याचे ठरविले.

काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने बृहस्पती याग करण्याचे ठरविले व नैमिषारण्यात घडलेल्या घटनेचा सूड उगविण्यासाठी भगवान शंकराला या यागाचे आमंत्रण हेतुपुरस्सर दिले नाही. मात्र इतर सर्व ऋषी, देव यांना आमंत्रण दिले. आपल्या पित्याकडे होत असलेल्या बृहस्पती यागाची बातमी सतीला नारदमुनींकडून समजली. पित्याकडून आपल्याला आमंत्रण देण्याचे चुकून राहून गेले असे वाटून यज्ञाला जाण्यासाठी तिने शंकराची अनुमती मागितली. पण विनाआमंत्रण तेथे जाण्यास भगवान शंकराने विरोध दर्शविला. पण सतीच्या आग्रहामुळे शंकराने मनात नसतानाही आपले रुद्रगण सतीसोबत पाठविले. सती यज्ञ समारंभासाठी पित्याकडे गेली. यज्ञमंडपात सती पोहोचली खरी पण तिचे आगमन दक्षला तसेच सतीच्या इतर बहिणीनांही रुचले नाही. तरीही सतीने हा अपमान सहन केला.

यागासाठी हवन चालू होते. एकामागून एक आहुती पडत होत्या. सर्व देवतांना आहुती देण्याचे कार्य चालू होते पण भगवान शंकराला आहुती देण्याचे मंत्र ज्यावेळेस सुरू झाले त्यावेळेस शंकरावर सूड घेण्याच्या बुद्धीने दक्षाने ते मंत्र म्हणण्यास मनाई केली. दक्षाने आरंभिलेला हा यज्ञ हरिद्वारजवळ असलेल्या कनखळ या गावी झाला होता असे सांगतात. त्यामुळेच तिथे दक्ष महादेव मंदिर असून दक्षाने केलेल्या बृहस्पती यागाची कुंडली पहावयास मिळते.

भगवान शंकराच्या आहुतीचे मंत्र वगळून पुढील आहुती सुरू झाल्या. आपल्या पतीचा झालेला हा अपमान सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर झाला. आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले. काही ग्रंथांमध्ये सतीने यज्ञकुंडाजवळ योगासन घालून बैठक घेतली व योग सामर्थ्याने आपल्या उदरातील अग्नी – जठराग्नी प्रदिप्त करून स्वत:ला जाळून घेतले, असा उल्लेख आहे. काही असले तरी सतीने आत्मसमर्पण केले हा मतितार्थ त्यातून निघतो. सतीच्या या अद्भुत कृत्याने सर्व रुद्रगणात एकच हाहा:कार उडाला.

सतीने ज्याठिकाणी देहत्याग केला होता त्याठिकाणी शंकर यज्ञभूमीत अवतरले आणि दु:खावेगाने बेभान झाले. त्यांनी सतीचा मृतदेह उचलला आपल्या खांद्यावर टाकला आणि तांडवनृत्य करीत सर्वत्र संचार करू लागले. शिवशंकर शांत होण्याचे चिन्ह दिसेना. त्यांचे संहाराचे कार्य स्थगित झाले त्यामुळे ब्रह्या, विष्णु आदी देवतांना फार चिंता वाटू लागली. जोपर्यंत सतीचा देह शंकराच्या खांद्यावर आहे, तोपर्यंत शंकर शांत होणार नाहीत, हे विष्णूंनी जाणले व त्यांनी आपले सुदर्शन चक्र सतीच्या देहावर सोडून तिच्या देहाचे लहान लहान तुकडे करण्यास प्रारंभ केला. तिच्या देहाचे अनेक तुकडे सर्वत्र विखुरले गेले. सती म्हणजे प्रत्यक्ष आदिशक्तिचे स्वरुप असल्याने ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली.