जर्सी नंबर १० आणि तिचा इतिहास…

shraddha-bhalerao श्रद्धा भालेराव। मुंबई

क्रिकेट असो किंवा फुटबॉल… सगळीकडेच १० नंबरच्या जर्सीने आपली कमाल दाखवली आहे. ब्राझीलचा स्टार खेळाडू पेलेमुळे या जर्सीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि नंतर ती अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाची भागीदार राहिली. तसं पहायला गेले तर ही जर्सी फक्त संघातील स्टार खेळाडूंना देण्यात येते. क्रिकेटच्या जगतात हा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देण्यात आला असून सचिन सोबतच त्याची ही १० नंबरची जर्सीही निवृत्त झाली आहे.

फुटबॉलमध्ये खेळाडूंना त्यांच्या पोजिशननुसार जर्सीचा नंबर देण्यात येतो. उदाहरणार्थ गोलकिपरला एक नंबर देण्यात येतो. त्यानंतर संघामध्ये ज्या पोजिशनवर खेळाडू खेळत असेल त्यानुसार (२-३-५ किंवा ४-२-४) याप्रमाणे मैदानावर खेळण्यासाठी उतरत असतील तर त्यांना त्याप्रमाणे जर्सी नंबर दिला जातो. फुटबॉलमध्ये अनेक खेळाडूंनी या जर्सीच्या साक्षीने आपल्या कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यातील काही प्रमुख खेळाडू पुढीलप्रमाणे –

१. १९५८ मध्ये ब्राझिलला विश्वचषक मिळवून देणारा स्टार खेळाडू पेले

brazil-pele

पेलेमुळेच या जर्सीला क्रीडाविश्वात वेगळी ओळख मिळाली. १९५८ मध्ये खेळवण्यात आलेल्या फिफा विश्वचषकाआधी १० नंबरच्या जर्सीला फारसे महत्त्व नव्हते. परंतु पेलेने ब्राझीलला पहिल्या विश्वचषक उंचावण्याचा मान मिळवून दिला आणि पेलेसोबत त्याच्या जर्सीचा नंबरही अमर झाला. विश्वचषकाच्या या सामन्यात ब्राझिल ४-२-४ च्या पोजिशननुसार मैदानात उतरली होती. पेले संघाचा दुसरा स्ट्रायकर वावाच्या मागे खेळत असे. त्यामुळे पेले ज्या पोजिशनवर खेळत असे त्यानुसार त्याला जर्सीचा १० नंबर देण्यात आला होता. त्यानंतर ती कायमस्वरूपी पेलेच्या नावाशी जोडली गेली. पेलेने १९५८ च्या विश्वचषकामध्ये पाच गोल केले असून त्यातील एक गोल अंतिम सामन्यात केला होता.

देश – ब्राझिल
चॅम्पियन – १९५८, १९६२,१९७०
सामने – ९२
गोल – ७७

२. १९८६ च्या विश्वचषकामध्ये अर्जेंटीनाची मदार सांभाळणारा डिएगो माराडोना

madarona

पेले आणि माराडोना म्हणजे दोन विरूद्ध दिशा. या दोघांचे एकमेकांशी फारसे चांगले संबंध नव्हते. तरीही १० नंबरच्या जर्सी मात्र त्यांच्या आवडीचीच होती. मेक्सिकोमध्ये आयोजन करण्यात आलेल्या १९८६ च्या विश्वचषकामध्ये माराडोनाचाच बोलबाला होता. अर्जेंटीनाने माराडोनाच्या मदतीने वेस्ट जर्मनीला हरवून विश्वचषकवर आपले नाव कोरले होते. माराडोनाने सेमीफायनलमध्ये बेल्जियमच्या विरूद्ध दोन गोल केले होते. त्यासाठी त्याला गोल्डन बॉलने गौरवण्यात आले होते.

देश – अर्जेंटीना
चॅम्पियन – १९८६
सामने – ९१
गोल – ३४

३. १९९८ मध्ये पहिल्यांदा फ्रान्सला विश्वचषक मिळवून देणारा धडाकेबाज जिनेदिन जिदान

zidan-01

जिदानच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर फ्रान्सने १९९८ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक पटकावला. जिदानने अंतिम सामन्यात ब्राझिलसारख्या तगड्या संघाविरूद्ध दोन गोल केले होते आणि संघाला विश्वचषकाचा सन्मान मिळवून दिला होता. जिदानही १० नंबरची जर्सी घालून खेळयचा.

देश – फ्रान्स
चॅम्पियन – १९९८
सामने – १०८
गोल – ३१

४. २००२ च्या विश्वचषकामध्ये ब्राझिलची धुरा सांभाळणारा रोनाल्डिन्हो

ronaldhino-01

२००२ मध्ये जपान आणि कोरिया या दोन देशांनी एकत्रितपणे आयोजन केलेल्या विश्वचषकामध्ये रोनाल्डिन्होचा तुफानी खेळ कायम स्मरणात राहिला. त्याने पाच सामन्यांमध्ये दो गोल केले आणि इतरांना गोल करण्यात मदतही केली होती. इंग्लंड विरूद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये ४० मीटरवरून फ्री किकने केलेला त्याचा गोल आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

देश – ब्राझिल
चॅम्पियन – २००२
सामने – ९७
गोल – ३३

५. दिग्गजांनंतर जर्सीची मदार आता मेस्सी आणि नेमार यांच्या खांद्यावर

messi-neymar-01

सध्या अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सी आणि ब्राझिलचा स्ट्रायकर नेमार या दोघांवर १० नंबरच्या जर्सीचा मान वाढवण्याची जबाबदारी आहे. तीन विश्वचषक खेळल्यानंतरही मेस्सी अर्जेंटिनाला विजय मिळवून देवू शकला नाही. तर नेमारने आतापर्यंत २०१४चा एकच विश्वचषक खेळला आहे, परंतु तोही आतापर्यंत संघासाठी विश्वचषकामध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. मेस्सीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक असू शकतो, त्यामुळे यंदा तो आपल्या संघाला हा किताब मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

आपली प्रतिक्रिया द्या