
ते ट्रकवरून उडय़ा मारत शीतपेये विकतील, पण तुम्ही लिंबू सरबतावर ठाम रहा’ अशी वाक्य वाचल्यावर विनोदाचा भाग सोडला तरी वाढता उन्हाळा आणि सरबताचं घट्ट नातं आहे. त्याच नात्याची ही गारेगार कहाणी.
हिंदुस्थानसह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, इराण, तुर्कस्थान, अरब देशांतील लोकप्रिय पेय म्हणजे सरबत. पर्शियन भाषेत सरबत म्हणजे साखरपाणी. अरबी भाषेतील पेयपानासाठी असलेला शब्द ‘शरीबा’ त्यापासून हा शब्द निर्माण झाला. इस्लाम धर्मात मद्यपानावर असलेल्या बंदीने या धर्माचे पालन करणाऱया देशांत सरबतांची लोकप्रियता अधिक होती. हिंदुस्थानी संस्कृतीत फळांच्या रसाचा उल्लेख प्राचीन काळापासून होताच, पण मुघलांच्या आक्रमणानंतर आपल्याकडे जीवनात सरबताचं महत्त्व वाढलं. बाबर विविध सरबतांचा शौकीन होता आणि थेट हिमालयातून बर्फ आणून तो या थंडगार सरबताचा आस्वाद घेत असे, असेही उल्लेख आढळतात.
सरबतांच्या लोकप्रियतेचं एक कारण म्हणजे विसाव्या शतकात फ्रिजिंगची पद्धत अवगत होईपर्यंत ताजी फळं जतन करण्याचा अन्य मार्ग उपलब्ध नव्हता. काही फळं विशिष्ट मोसमातच उपलब्ध होतात. मोसमानंतर या फळांचा आस्वाद घेण्यासाठी ही फळं सुकवून ती साखरेच्या पाकात घालून ते जतन करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे मोसम संपल्यावरही फळांच्या रसाचा आस्वाद घेण्याचा पर्याय म्हणून सरबतं अस्तित्वात आली.
आपल्याकडे घरी आलेल्या पाहुण्यांना विसावा घेण्यासाठी गूळपाणी देण्याची पद्धत होती. आजही उन्हाळय़ात घरी आलेल्या पाहुण्यांना सरबत देण्याची पद्धत पाळली जाते. तुर्कस्थानात जेवणाआधी आणि जेवणासह सरबत पिण्याच्या पद्धतीचा उल्लेख होतो. तुर्की मंडळींनी तीन पद्धतीने सरबतांचा विचार केलेला दिसतो. सिरप, पेस्ट आणि गोळी. ताज्या फळांचा गर काढून ठेवला जाई आणि गरजेनुसार त्यात पाणी घालून सरबत तयार होई. पेस्ट बनवणं तुलनेने कमी होतं आणि गोळी बनवण्यासाठी, फळांचे रस, गुलाब किंवा वेलचीचं तेल उकळत्या साखर पाण्यात घालून इतके आटवले जाई की त्यातील पाणी निघून जात असे. त्या मिश्रणात अन्य सामग्री घालून ते मिश्रण थंड केलं जाई. त्याच्या गोळय़ा बनवल्या जात आणि नंतर दीर्घ कालावधीसाठी त्या गोळय़ा पाण्यात विरघळवून सरबत बनवले जाई.
या सरबताशी विविध प्रथा जोडलेल्या दिसतात. मोहम्मद पैगंबर यांना जन्म देताना त्यांच्या आईला आलेला थकवा दूर करण्यासाठी विशिष्ट सरबत दिले गेले होते. आजही काही मुस्लीम देशात बाळाचा जन्म झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्यांना ‘लोहुसा सरबती’ हे सरबत प्रथेचा भाग म्हणून दिलं जातं. किंवा ‘निसान सरबती’ अर्थात लिंबू सरबत तुर्कस्थानात साखरपुडय़ाच्या वेळी आवर्जून दिलं जातं.
आज नव्या तंत्रज्ञानामुळे फळांची उपलब्धता, ताजेपणा सगळंच विकसित झालं आहे तरी विविध सरबतं मनाला मोहवत राहतात. मुळात सरबताची खासियत म्हणजे ते झटपट पटपट बनतं. शरीरालाच नाही तर मनाला गारवा देतं. उन्हाच्या कहरातून घामाघूम होऊन घरी यावं आणि कुणीतरी गारेगार लिंबू, आवळा, कोकम सरबताचा ग्लास हातात द्यावा. दोन क्षणांत सगळा उन्हाळा परतवून लावण्याची ताकद या सरबतात नक्कीच असते. चला तर, हा उन्हाळा शीतपेयांच्या नाही तर नैसर्गिक सरबतांच्या जोडीने गारेगार करूया. उन्हाळा आणि सरबताचे असं घट्ट नातं आहे.
मनाला शांती देणारी पेये
लिंबू सरबत, कोकम सरबत, वाळय़ाचे सरबत, पन्हे हे प्रकार आपल्याकडे लोकप्रिय आहेत, पण एकेकाळी विलक्षण लोकप्रिय असलेला सरबताचा प्रकार म्हणजे ‘रूह अफजा’. या सरबताबाबत दोन टोकाची मते दिसतात. काहींना ते खूप आवडायचे तर काहींना बिल्कुल नाही. दिल्लीतील हमदर्द दवाखान्याचे डॉक्टर (हकीम) अब्दुल हाफीझ माजिद यांनी हे सरबत तयार केले. युनानी औषधशास्त्र्ााचा भाग म्हणून गुलाब किंवा केवडय़ाचे सरबत उष्णता विकारांवर ते देत. त्यातूनच त्यांनी हे सरबत बनवलं. रुह अफजा म्हणजे मनाला शांती देणारे.