गूगल मॅपने अरबी समुद्रात केरळजवळ शोधले नवे बेट!

अरबी समुद्रात केरळजवळ गूगल मॅपने एक नवे बेट असल्याचा शोध लावला आहे. या विशिष्ट प्रकारच्या बेटाबाबत संशोधकांनाही उत्सुकता आहे. केरळजवळ हे बेट असल्याचे गुगल अर्थवर दिसत आहे. हे खरोखरच बेट आहे किंवा इतर काही पदार्थ, माती किंवा वाळूचा ढिगारा आहे, याबाबत संशोधकांना उत्सुकता असून त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अभ्यासानंतरच याबाबत मेनकी माहिती स्पष्ट होईल, असे संशोधकांनी सांगितले.

हे बेट कोचीच्या समुद्रकिनाऱ्यापासून 7 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गूगल अर्थच्या माहितीनुसार हे बेट 8 किलोमीटर लांब आणि 3 किलोमीटर रुंद आहे. विशेष म्हणये कोची किनाऱ्याजवळ किंवा समुद्रात बेट बनल्याच्या कोणत्याही खूण दिसत नसल्याने हे नेमके काय आहे, असा प्रश्न संशोधकांनाही पडला आहे. तसेच या समुद्र किनाऱ्याहून मासेमारी बोटी किंवा जहाजे सहजतेने प्रवास करत आहेत. त्यांना या बेटाची काहीही अडचण होत नाही.

केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अॅण्ड ओशन स्टडीजने या बेटाचा अभ्यास करण्याची तयारी सुरू केली आहे. या बेटाच्या अभ्यासानंतरच हे नेमके काय आहे, ते स्पष्ट होईल, असे विद्यापीठाचे कुलपती रिजी जॉन यांनी सांगितले. गूगल मॅपवर पाहिले असता, हे बेट इतर पाण्याखाली असलेल्या बेटांसारखेच दिसत आहे. पाण्याखाली असलेल्या बेटांची काही वैशिष्ट्ये असतात. हे त्यापैकीच आहे काय, याचा अभ्य़ास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे बेट नेमके कशापासून बनले आहे, त्याचाही शोध घ्यावा लागेल. समुद्रातील अशी बेटे वाळू किंवा मातीपासून बनलेली असतात. याच्या अभ्यानंतरच हे बेट नेमके कसे तयार झाले ते स्पष्ट होणार असल्याचे जॉन यांनी सांगितले. या बेटाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जॉन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या