मावशी-भाची पडल्या एकमेकींच्या प्रेमात; लॉकडाऊन आधी लग्न, अनलॉकमध्ये फरार

फोटो- प्रातिनिधिक

यूपीच्या कानपूरमध्ये मावशी आणि भाचीच्या प्रेमसंबंधातील एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. 2 सप्टेंबर रोजी चकेरी भागातून एक 19 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. त्याच दिवशी तिची भाचीही लखनौहून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एकाच दिवशी मावशी आणि तिची भाची गायब होणं यामुळे कुटुंबीय हैराण झाले होते. त्यांना वेगळाच संशय आला होता, अखेर तोच खरा ठरला.

चकेरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हरजेंदर नगरात एक कुटुंब भाडे तत्त्वावर राहते. कुटुंबप्रमुख खासगी क्षेत्रात कामगार म्हणून काम करतो. त्याची मुलगी 2 सप्टेंबर रोजी दुपारी बाजारात जायला सांगून घराबाहेर पडली. यानंतर मुलगी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला पण कोणतीही माहिती हाती लागली नाही. अखेर या कुटुंबाने 3 सप्टेंबर रोजी चकेरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याचा अहवाल नोंदवला.

त्याच दिवशी बेपत्ता मुलीच्या मोठ्या बहिणीची मुलगी म्हणजेच तिची भाचीही घरातून बेपत्ता झाली होती. मावशी-भाची दोघी एकाच दिवशी बेपत्ता झाल्याने कुटुंबांमध्ये खळबळ उडाली होती. या दोघीही एकत्र घराबाहेर पडल्या असतील असा संशय कुटुंबाला होता. त्यासोबतच दोघींचेही मोबाईल फोनही स्विच ऑफ होते. दोघींच्या कुटुंबीयांनी पोलिसांना मदतीसाठी विनंती केली.

खरं तर ही मावशी आणि तिची भाची यांचे अनेक टिकटॉक व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. या व्हिडीओतील त्यांची जवळीक पाहता कुटुंबीयांनाही प्रश्न होता की यांचं एवढं कसं काय पटतं. त्या दोघींबद्दल संशय आला होता. मात्र त्या दोघी वेगळं काही पाऊल उचलतील असं त्यांना वाटत नव्हतं.

चकेरी पोलिसांनी सर्विलन्सच्या मदतीने दोघींचे लोकेशन ट्रेस केले. पोलिसांनी गाझियाबादच्या अनवरगंज भागातून मावशी व भाची सह त्यांच्या एका मैत्रिणीला ताब्यात घेतले. या भागात त्या तिघी भाडे तत्त्वावर घर घेऊन राहत होत्या.

पोलिसांनी या तिघींची चौकशी केली तेव्हा मावशी आणि भाची यांनी जानेवारी महिन्यातच लपून लग्न केल्याचे सांगितले. पण लॉकडाऊनमुळे त्या एकत्र राहू शकत नव्हत्या असं त्या म्हणाल्या. अखेर फेसबुकवरून मैत्री झालेल्या तिसऱ्या मैत्रिणीने त्यांना गाझियाबादमध्ये बोलवले. तिथे भाडेतत्त्वावर घर घेऊन या तिघी राहत होत्या. या तिघींची कहाणी ऐकून पोलीस देखील हैराण झाले होते.

त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलींच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलवले. पालकांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. हिंदी वृत्तसंकेतस्थळ एनबीटीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या