भटक्या कुत्र्यांनी तोडले सात जणांचे लचके

सामना प्रतिनिधी । टिटवाळा

कल्याण-डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून एकाच दिवशी  सात जणांचे लचके तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आश्चर्य म्हणजे गेल्या तीन वर्षांत कोटय़वधी रुपये संपवून २५ हजार श्वानांचे निर्बिजीकरण करूनही त्यांचा उच्छाद सुरूच आहे. त्यामुळे रोजच रात्री-अपरात्री कामावरून घरी येणाऱया  नागरिकांवर घोळक्याने भटकी कुत्री हल्ला करत आहेत. याबाबत तक्रारी वाढूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने  निर्बिजीकरणावरील खर्च पाण्यात गेला आहे.

शिवसेनेच्या महिला उपशहर संघटक आशा सावरकर-रसाळ या कल्याण पश्चिमेतील न्यायालयात जात असतानाच एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना रक्तबंबाळ केले.  त्यांना लागलीच पालिका रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जखमेवर सात टाके घालण्यात आले. त्यांच्या मागोमाग त्याच भटक्या कुत्र्याने एका पोलीस हवालदाराला व एका महिला वकिलाचेही त्याने लचके तोडले.  याबरोबरच अन्य चार जणांवरही कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली असून या वाढत्या उच्छादामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अक्षरशः कठीण होत चालले आहे.

तरीही संख्या वाढतेच आहे

भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम पालिकेने कल्याण येथील  ‘पेट्स सोसायटी फॉर ऑनिमल वेल्फेअर ऍण्ड डेव्हलपमेंट’ या सामाजिक संस्थेला दिल्या आहेत. ही संस्था भटक्या कुत्र्यांना केंद्रात आणून नसबंदी करते व ऍण्टी रेबीज लस देऊन चौथ्या दिवशी पुन्हा जेथून पकडले त्या ठिकाणीच त्या श्वानाला सोडले जाते. यासाठी प्रत्येक भटक्या कुत्र्यामागे ९९० रुपये पालिका मोजते. इतकी व्यवस्था असतानाही शहरातील कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.

८ जानेवारी २०१५ पासून २५ हजार श्वानांवर निर्बिजीकरण करण्यात आले. त्यासाठी वार्षिक ८० लाख रुपयांची तरतूद पालिकेने केली आहे.

ज्येष्ठ शिवसैनिक व संकल्प प्रतिष्ठान टिटवाळ्याचे अध्यक्ष  विजय देशेकर यांनी भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या