राज्यात महाविकास आघाडीचीच ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित; छगन भुजबळ यांना विश्वास

राज्यात महाविकास आघाडीची ताकद असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तोपर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे ,असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारानी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उमेदवारी मिळूनही अर्ज न भरणे ही पक्षविरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यामुळे जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा, असा सवाल त्यांनी विरोधकांना नाव न घेता केला. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, दत्ता गायकवाड, प्रेरणा बलकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.