रमजान ईदमुळे कडक निर्बंध शिथील, उद्यापासून किराणा दुकाने उघडणार, हातगाड्यांवर फळे, दूध, चिकन, मटण विक्रीला परवानगी

जिल्ह्यात वाढत जाणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी 8 ते 13 मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. मात्र रमजान ईदच्या कारणामुळे हे निर्बंध आता शिथील केले आहेत. उद्या 11 मेपासून सकाळी 7 ते 12 या कालावधीत किराणा दुकान, सुकामेवा, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटण, अंडी, मासे, बेकरी, दूध विक्री दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हातगाड्यांवर फळे, दुधासोबत चिकन मटन विक्रीला परवानगी दिल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यात दररोज 1000 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून येत होते. त्यामुळे 8 ते 13 मे या कालावधीत विकेंड लॉकडाऊनप्रमाणे लागू करण्यात आले होते, मात्र रमजान ईदच्या कारणावरून हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. 11 व 12 मे रोजी सकाळी 7 ते 12 या कालावधीत किराणा दुकान सुकामेवा, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटन दुकाने, अंडी, मासे, बेकरी, दूध विक्री दुकाने सुरू राहणार आहेत.

12 मे रोजी केवळ हातगाड्यावर फिरून फळांची विक्री, दूध विक्री, चिकन, मटण विक्री सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत करता येईल. ईदनिमित्त एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आपल्या घराच्या जवळच्या दुकानातून खरेदी करावी. होम डिलेव्हरीला प्राधान्य द्यावे, खरेदीसाठी वाहनाचा वापर टाळावा तसेच किराणा भाजीपाला खरेदीसाठी गंजगोलाई, मस्जीद रोड, भुसार लाईन, सुभाष चौक, अंबा हनुमान, खोरे गल्ली, मित्र नगर, दयानंद गेट मेन रोड, राजीव गांधी चौक येथे गर्दी करू नये.

नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी दुकानदारांनी दुकानासमोर वर्तुळ काढावे त्यात गिऱ्हाईकांना उभे राहण्यास सांगावे, जीवनावश्यक वस्तु व्यतिरिक्त इतर वस्तू, सामान विक्री करू नये, 13 मे रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत सुकामेवा, फळ विक्री, चिकन, मटण विक्री सुरू राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या