१०० किलोपेक्षा जास्त कचरा केल्यास कारवाई करणार

27

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरात काही दिवसांपासून कचरा कोंडी झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. त्यासाठी शहरातील मोठी व्यापारी संकुले, मॉल्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये, रसवंतीगृह चालकांना योग्य प्रतिसाद द्या, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी दालनात झालेल्या बैठकीत दिल्या. कचरा नियोजनासाठी योग्य प्रतिसाद दिला नाही तर घनचकरा व्यवस्थापन कायदा २०१६ नुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.

शहरात काही दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फोडण्यासाठी पदाधिकारी प्रशासन प्रयत्नशील आहे. शहरात ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, शहरातील हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालयांचे मालक तसेच रसवंतीचालकांकडून हा नियम पाळला जात नाही. त्यामुळे ओल्या कचऱ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची बैठक महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयोजित केली होती. या बैठकीला सभागृहनेते विकास जैन, सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे, विरोधी पक्षनेते फिरोज खान, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, विशेष अधिकारी विक्रम मांडुरके यांची उपस्थिती होती. यावेळी महापौर घोडेले यांनी सांगितले की, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या प्रतिष्ठानांचा कचरा यापुढे पालिका घेणार नाही. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निघणाऱ्या हॉटेल, मॉल्स, व्यापारी संकुले, मंगल कार्यालयचालकांनी स्वत:च त्यांच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी. त्यांनी प्रक्रिया केली नाही तर कारवाई करू, त्यात प्रारंभी दंडात्मक तर नंतर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही महापौर घोडेले यांनी सांगितले.

सर्वाधिक कचरा रसवंत्यांचा
सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहरात जवळपास ५०० हून अधिक रसवंत्या आहेत. त्यापैकी महापालिकेकडून नोंदणी घेणाऱ्या फक्त ७५ रसवंत्या आहेत. रसवंतीचालक रस काढल्यानंतर शिल्लक राहणारे चिपाड पालिकेच्या कुंड्यांत टाकतात. त्यामुळे यापुढे हे चिपाड कचरा कुंडीत टाकू नये, अन्यथा रसवंत्या बंद करू, अशा सूचना दिल्या.

प्लास्टिक जप्ती मोहिमेच्या तयारीसाठी आज बैठक
ह शहरात निघणाऱ्या कचऱ्यापैकी सर्वाधिक प्रमाण हे प्लास्टिक पिशवींचे आहे. त्यामुळे प्लास्टिक जप्तीची मोहीम राबविण्यासाठी पोलिसांनीदेखील पुढाकार घ्यावा, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांना केली. त्यासाठी उद्या गुरुवारी महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच महापालिकेचे सर्व पदाधिकारी आणि व्यापारी महासंघाची एक संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याची माहिती सभागृहनेता विकास जैन यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या