कांद्याची 40 कोटींची उलाढाल ठप्प; शेतकरी संकटात, आंदोलन चिघळणार

नाशिक जिह्यात व्यापाऱ्यांनी अचानक कांदा लिलाव बंद केल्यामुळे सुमारे दोन लाख क्विंटल कांदा खरेदी थांबली आहे. दररोजची जवळपास 40 कोटी रुपयांची उलाढालही ठप्प झाली आहे. त्यामुळे जिह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने याप्रश्नी तात्काळ तोडगा काढावा आणि आपल्या दालनात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह चर्चा करण्याकरिता वेळ द्यावा, अन्यथा हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीक्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी मिंधे सरकारला दिला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री धनंजय मुंडे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले आहे. कांदा, द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्हा जगभरात प्रसिद्ध असताना जगाला कांदा पुरविणाऱ्या नाशिक जिह्यात व्यापाऱ्यांनी अचानक लिलाव बंद केल्यामुळे दोन दिवसांपासून जिह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारने नेहमीच कांदा व टोमॅटो उत्पादकांवर अन्याय केला आहे. सत्तेत आल्यापासून सरकारने शेतकरी हिताचे धोरण राबविलेले नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे का, असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.