बेधडक

132

>>स्वप्नील साळसकर

ज्यांचे नाव घेतले तरी वाळूमाफियांची टरकते, अशा एक डॅशिंग महिला तहसीलदार आहेत. शिल्पा ठोकडे… त्यांची ‘लेडी सिंघम’ म्हणूनच ओळख निर्माण झाली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आपल्या कार्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. अवघ्या तीन महिन्यांत चोरटय़ा वाहतुकीवर वचक बसवितानाच ठोकडे यांनी तब्बल एक कोटी ६० लाखांचा महसूलही शासनाच्या तिजोरीत जमा करून दिला.

दक्षिण सोलापूर तहसीलदार पदावर असणाऱ्या ठोकडे यांनी तीनच महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी सोलापूरमध्ये सव्वा वर्षाच्या कालावधीत तीन कोटी ७८ लाखांचा दंड बेकायदा वाळू वाहतुकीतून वसूल केला होता. आपली भूमिका पर्यावरणपूरक असून शासनाच्या नियमाप्रमाणेच वाळू वाहतूक व्हावी अशी आहे. नियमाप्रमाणे एका पासवर दोन ब्रास वाळू वाहतूक होऊ शकते. त्यांची किंमत आहे १८ हजार. मात्र १० हजार रुपयेप्रमाणे दोन ब्रास बेकायदा वाळूची विक्री सर्रासपणे होत असते. त्याच्याही पलीकडे मोठी चोरटी वाहतूक होते. मात्र त्यावर पाचपट दंड आकारण्याची तरतूद आहे आणि अशी चोरटी वाहतूक रोखणे मोठे आव्हान असते. पण आपल्या हातातून बेकायदा वाळूच्या गाडय़ा अद्याप सुटल्या नसल्याचे त्या म्हणाल्या.

वाळू वाहतूक रोखणे जिकरीचे काम असते. कारण आजच्या घडीला अधिकाऱ्यांना धमकावण्याचे, दादागिरीचे प्रमाण महाराष्ट्रात पाहावयास मिळते. माझ्याही बाबतीत तसेच झाले. माझ्या घरावर वॉच ठेवणे, कुटुंबाला धमकी द्यायची, मुलांच्या गाडय़ांचा पाठलाग करून दमदाटी करायची आणि भीती निर्माण करण्याचे प्रकारही सोलापूर जिल्हय़ात तहसीलदार असताना झाले. मात्र पोलीस अधीक्षक राजेश प्रधान तसेच जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी खूप पाठबळ दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेशांतराची कल्पना

वाळू व्यावसायिकांना दणका द्यायचा असा चंग बांधलेल्या ठोकडे यांना वेशांतर करायची कल्पना सुचली. त्यानुसार २९ डिसेंबरला सासरी सांगोला येथे एसटी बसने पोहोचून त्या ठिकाणी आजूबाजूच्या सहा महिला तलाठी आणि मंडल अधिकारी यांना याबाबतची कल्पना दिली आणि स्वत:सह सहकारी महिलांना कर्नाटकी साडी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सदरा आणि धोतर असे वेश परिधान करून वेशांतर केले. त्यानंतर वडापच्या (सहा आसनी रिक्षा) गाडीतून जतमार्गे भीव घाटात येऊन ठाण मांडले. रात्रीची १२.३० ची वेळ होती. यावेळी बेगमपूर, पंढरपुरातून सांगली, कोल्हापूर, राधानगरीकडे वाळू वाहतूक करणाऱया ट्रकचालकांना वाटले, या महिला जत येथील यात्रेतील असाव्यात. म्हणून त्यांनीही गाडय़ा थांबवल्या. मात्र तहसीलदारांसह तलाठी महिला असल्याचे कळताच चालकांचे अवसानच गळाले. एकाच रात्रीत १३ ट्रक पकडून त्यांनी एक कोटी ६० लाखांचा दंड वसूल केला. ही कारवाई सकाळी ६ वाजेपर्यंत सुरूच होती.
सांगली जिह्यातील कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे… या जिह्यातील आपल्या धडक कारवाईमुळे त्यांनी असंख्य वाळुमाफियांना जेरीस आणले आहे.

१२४ पुरस्कारांनी गौरव

जिवाची तमा न बाळगता भ्रष्टाचार थांबविणे, वाळूचोरी थांबविणे, अवैध दारूधंद्यांना आळा घालणे, महसूल प्रशासनातील महसूल वाढविणे यांसह इतर कामांतही अठोसर महिला म्हणून कार्य करणाऱया या महिलेचा तब्बल १२४ विविध पुरस्कारांनी गौरव झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अशा बेकायदा वाळू वाहतुकीला लगाम बसणे गरजेचे आहे. कारण वाळूमध्ये नदीतील पाणी थांबविण्याची क्षमता असते. शिवाय एक वाळूचा कण तयार होण्यास कित्येक दिवसांचा कालावधी लागतो. मात्र प्रमाणापेक्षा वाळू उत्पन्न केल्यामुळे नदीत डोह निर्माण होतो. पाणीही दूषित होते. पावसाळय़ात पाण्याचा प्रवाह वाढतो. परिणामी पुराची समस्या उद्भवू शकते आणि याचा धोका नदीकिनाऱयावरील घरांनाच जास्त असतो. नदी स्वच्छ करण्यापुरता गाळ (वाळू उपसा) करून पाणी स्वच्छ ठेवणे पर्यावरणाच्या हिताचे असल्याचे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या